आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली; दशरथ सावंत यांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली असल्याने शेतकऱ्यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. दुधाला हमीभावासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल. राज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे किंवा प्रतिलिटर २७ रुपये हमीभाव द्यावा, यासह अन्य काही मागण्यांसाठी सोमवारपासून (१६ जुलै) सुरु होत असलेल्या दूध पुरवठा बंद आंदोलनात संगमनेर-अकोले तालुक्यातील दूध उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी केले. 


दुधाला हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दूध पुरवठा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यासंबधी माहिती देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत यांनी हे आवाहन केले. शरद थोरात, संतोष रोहोम, अरुण इथापे, रावसाहेब डुबे, दीपक वाळे, दिलीप कडलग, शांताराम शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. 


सावंत म्हणाले, शेतीच्या सध्याच्या अवस्थेला भाजपचे सरकार जबाबदार आहे. बाजारभाव नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक चालवली आहे. शेतकऱ्यांचा विश्वासघात सुरु असून बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृध्दी मार्ग आदी अन्य विषयांकडे सरकारचे लक्ष आहे. दिल्लीत कांदे महागले म्हणून इकडे बाजारभाव कमी केले जातात. सरकारच्या फसव्या घोषणा करते. या घोषणांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा पाठिंबा 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला. तसे पत्रक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी रविवारी प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे, दूध ऊत्पादकांच्या रास्त मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना व संघर्ष समिती गेली सहा महिने सातत्याने संघर्ष करत आहे. लुटता कशाला फुकटच न्या म्हणत लाखगंगा येथून सुरू झालेल्या आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटनेने सहभाग घेतला आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तीन वेळा शासनादेश काढले. दोन वेळा अर्थसाहाय्याच्या घोषणाही केल्या. मात्र, प्रत्येक वेळी दूध ऊत्पादकांना मदत करण्याऐवजी सरकारने दूध पावडर बनवणाऱ्या कंपन्यानाच केवळ मदत केली. दूध ऊत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असे वाडेकर म्हणाले. 


दूध संकलन बंद ठेवा 
संगमनेर तालुका दूध संघ, एस. आर. थोरात दुध, श्रमिक दूध, किल्ले गगनगड दूध, प्रभात दूध, अमूल दूध आदी दूध संस्थांना निवेदने देऊन या आंदोलनकाळात दूध संकलन बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकाळात या संस्थांनी आपले दूध संकलन बंद ठेवून सहभागी व्हावे. '' शरद थोरात, शेतकरी नेते. 

बातम्या आणखी आहेत...