आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी- घोटणच्या धर्तीवर वृद्धेश्वर कारखान्याविरुद्ध कृती समितीने रणशिंग फुंकले आहे. येत्या चार जानेवारीला खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको गव्हाणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन सोमवारपासून कारखाना कार्य क्षेत्रातील सर्व गावांमध्ये सभा घेण्यापासून जनजागृती मोहीम सुरू होईल. ३० डिसेंबरला मिरी येथे महामेळावा होणार आहे, असे कृती समितीतर्फे जाहीर करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना वृद्धेश्वर ऊस उत्पादक संघर्ष समितीतर्फे गेल्या महिन्याभरापासून कारखान्याने शेजारील अन्य कारखान्यांप्रमाणे पहिला हप्ता २५५० रुपयांप्रमाणे द्यावा या मागणीसाठी आंदोलन हाती घेतले जात आहे. ‘वृद्धेश्वर’ने २१५० प्रतिटन पहिला हप्ता जाहीर केल्याने ऊस उत्पादकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवशंकर राजळे, ऊस उत्पादकांचे नेते अमोल वाघ, अनिल ढाकणे, शेतकरी संघटनेचे शरद मरकड, दत्ता फुंदे, रामकिसन शिरसाट, संदीप राजळे आदी उपस्थित होते.
कराळे म्हणाले, ‘वृद्धेश्वर’चा भाव अजून ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचला नाही. शेतकऱ्यांची कामधेनू कोणासाठी कामधेनू ठरत आहे. संचालक मंडळाची भूमिका ताठर असून कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे मात्र ऊस उत्पादकांच्या बाजूने आहेत. त्यांना बदनाम करण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आण्यासाठी काही संचालक पडद्याआडून डाव खेळत आहेत. शेवगाव घोटणप्रमाणे आंदोलनाला वळण लागले, तर त्याला कारखान्याचे संचालक मंडळ प्रशासन जबाबदार राहणार आहे. साखर आयुक्त कारखान्याची मिलिभगत असल्याने शेतकरी भरडून निघत आहेत. १५ कोटींंचे खाते थकीत असता सत्तेच्या माध्यमातून जिल्हा बँकेने दबावात येऊन पुन्हा कर्ज दिले.
सत्तेच्या दबावात विविध चौकशा थांबवल्या किरकोळ अपवाद वगळता कारखाना तुमच्या ताब्यात असताना कोट्यवधींचा कर्जबाजारीपणा कसा आला. कामगारांचे अनेक दिवसांपासून पगार नाहीत. जिल्ह्यात सर्वात कमी पगार वृद्धेश्वरच्या कामगारांना असूनही निमूटपणे ते सर्व सहन करतात. निवडणुका बिनविरोध होतात बहुसंख्य संचालक एसटीने बैठकीला येतात. मग खर्च कोठे होतो, कोणासाठी कोणावर होतो याचा खर्च माहिती आपण विविध सभांमधून ऊस उत्पादकांपुढे आणणारे आहोत. कारखान्यासाठी एका पिढीने त्याग केला. आता दोन चार संचालक अधिकारी मिळून शेतकरी कारखान्याला नीट करायला निघाले आहेत. विविध समविचारी नेते पाथर्डी शेवगाव तालुक्यातील ऊस उत्पादक ज्यांनी गाळपासाठी ऊस दिला आहे, असे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील. राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
‘वृद्धेश्वर’चा राहुरी कारखाना करू नका
शेतकऱ्यांनासंघर्षाला प्रवृत्त करू नका, त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. एवढ्या वर्षात कारखान्याने कधी लाभांश दिला नाही. सभासदाला दिवाळीची साखरसुद्धा रडत-खडत दिली. ऊस गाळपासाठी राजकीय विरोधकांना सापत्न भावाची वागणूक देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण आणण्याचे पाप महागात पडेल, सर्व कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा, असे शासनाचे आदेश पाळले जात नाहीत. ‘वृद्धेश्वर’चा राहुरी कारखाना करू नका, असे कराळे यावेळी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.