आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीच्या प्रेमापोटी आरोपी सातपुते पोलिसांना शरण; न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेतील ३६ लाख ६५ हजार रुपयांच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य आरोपी रोहिदास सातपुते हा सोमवारी सकाळी स्वत:हून कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाला. गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सातपुते याची संपत्ती जप्त करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली होती. त्याचबरोबर त्याच्याविरोधात स्टँडिंग अटक काढावे, अशा मागणीचे पत्रही पोलिसांनी न्यायालयाला दिले. अखेर संपत्ती जप्त होण्याच्या भीतीने सातपुते पोलिसांना शरण आला. न्यायालयाने त्याला चार दिवसांची (२४ मे पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली. 


'घोटाळ्यांचा मास्टरमाइंड' अशी आरोपी सातपुते याची महापालिकेत ओळख आहे. यापूर्वी त्याने अनेक घोटाळे केले आहेत. परंतु राजकीय वरदहस्तामुळे सातपुते याने हे सर्व घोटाळे पचवले. विद्युत विभागप्रमुखपदी असताना केलेला ३६ लाख रुपयांच्या पथदिवे घोटाळ्यात मात्र तो अडकला. याप्रकरणी तत्कालीन महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी सातपुते याच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी ठेकेदार सचिन सुरेश लोटके, कर्मचारी बाळासाहेब चंद्रकांत सावळे व भरत त्र्यंबक काळे या आरोपींना अटक करण्यात आली. परंतु घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सातपुते गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी त्याची संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरू केली होती. त्याचबरोबर सातपुते याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट काढावे, या मागणीचे पत्र देखील न्यायालयाकडे देण्यात आले होते. अखेर संपत्ती जप्त होण्याच्या भीतीमुळे सातपुते सोमवारी सकाळी पोलिसांना शरण आला. दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस सातपुते याची कसून चौकशी करणार आहेत. घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, मूळ फाईली, तसेच घोटाळ्यातील पैसे कुठे ठेवले आदी बाबी सातपुते याच्या चौकशीतून समोर येणार आहेत. या घोटाळ्यात सातपुते याने ५ लाख, निलंबित उपायुक्त विक्रम दराडे याने २ लाख, कॅफो दिलीप झिरपे याने एक लाख व महापौर कार्यालयातील कर्मचारी शशिकांत देवकर यांनी एक लाख अशी एकूण ९ लाख रुपयांची लाच घेतली असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी उपायुक्त दराडे व कॅफो झिरपे यांना अटक केली. परंतु तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर दोघेही जामिनावर सुटले. 


सातपुते व नगरसेवक एकाच कोठडीत 
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी फरार आरोपी व पथदिवे घोटाळ्यातील आरोपी सातपुते योगायोगाने एकाच दिवशी पोलिसांना शरण आले. न्यायालयाने सर्व आरोपींना २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे तोडफोड प्रकरणातील आरोपी व सातपुते यांचा चार दिवस एकाच कोठडीत मुक्काम राहणार आहे. विशेष म्हणजे तोडफोड प्रकरणातील आरोपींमध्ये अनेक नगरसेवकांचा समावेश आहे. सातपुते हा अनेक नगरसेवकांचा लाडका असून कोठडीत त्यांच्या काय गप्पा रंगतात याची उत्सुकता लागली आहे. 


सातपुते यानेच केली पैशांची वाटणी 
सातपुते हा घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहे. त्याने मुळ फाईली लपवल्या आहेत, घोटाळ्यातील पैशांची वाटणी देखील सातपुते यानेच केलेली आहे. त्याच्या विरोधात सबळ पुरावे असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. घोटाळ्यातील आरोपींची गय केली जाणार नाही. मुळापर्यंत जाऊन घोटाळ्याचे सत्य बाहेर काढणार आहे.
- सुरेश सपकाळे, पोलिस निरीक्षक, तोफखाना. 


फास आवळताच आला शरण 
कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेला आरोपी सातपुते हा पथदिवे घोटाळ्यात अडकल्यानंतर फरार झाला. पोलिसांनी त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला. त्याच्या मुलाला देखील हजर होण्याची नोटीस बजावली. सर्वत्र शोध घेऊनही तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर त्याच्या विरोधात स्टँडिंग अटक वारंट काढावे, अशा मागणीचे पत्र पोलिसांनी न्यायालयाला दिले. त्याचबरोबर त्याची संपत्ती जप्त करण्याबाबतही पोलिसांनी हलचाली सुरू केल्या. त्यामुळे घाबरून गेलेला सातपुते सोमवारी सकाळी पोलिसांना शरण आला. 


काय आहे पथदिवे घोटाळा? 
अभियंता आरोपी सातपुते, कर्मचारी सावळे, काळे, ठेकेदार लोटके, तसेच निलंबित उपायुक्त दराडे व कॅफो झिरपे यांनी संगणमताने हा घोटाळा केला. प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये पथदिवे बसवले असल्याचे दाखवत महापालिकेतून लाखो रुपयांचे बिल काढण्यात आले. प्रत्यक्षात एकही पथदिवा बसवला नसल्याचे पोलिस तपासात पुढे आले. 

बातम्या आणखी आहेत...