आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर कर्जतकरांना शुद्ध पाणी; डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत- पाण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांच्या काठ्या खाणाऱ्या कर्जतच्या नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे भाग्य मला मिळते आहे याचे समाधान आहे, असे गृह राज्य व नागरी शहर विकासमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शहर पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात रविवारी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते. 


महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानअंतर्गत शहर पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण व वचनपूर्ती सोहळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनसह विविध विकासकामांचे भूमिपूजन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाआधी फिल्टर केलेल्या पाण्याने भरलेल्या कलशाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीबरोबरच मंत्री डॉ. पाटील, शिंदे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके यांच्यासह सर्व नगरसेवक कार्यक्रमस्थळी आले. 


मंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांनी विरोध केल्यामुळेच आपण चांगले काम करू शकलो. आपण जे बोलतो त्याचा अभ्यास करून काम करतो. शालेय जीवनात कर्जतची पाणीटंचाई अनुभवली होती. यापूर्वीच्या सर्व पाणी योजना कुचकामी ठरल्या होत्या. त्यामुळे उजनी बॅकवाटरमधून पाणी योजना करण्याचे निश्चित केले. आपण जे भोगले ते जनतेने भोगू नये, म्हणून पाणीप्रश्न प्राधान्याने नगराध्यक्ष राऊत यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सोडवला. सतरा महिन्यांत योजना पूर्ण करत कर्जतकरांसाठी शुद्ध पाणी उपलब्ध करण्यात आले. 


यापूर्वी कर्जतला आधी चहा घ्यावा लागत असे. नंतर प्यायला पाणी दिले जायचे. पुढील २० वर्षांचे नियोजन करत पाणीप्रश्न सोडवला. कर्जतचा चेहरा-मोहरा बदलत असून अजून बरेच काम करायचे आहे. आपण आपल्या वचनाची पूर्ती केल्याचा उल्लेख मंत्री शिंदे यांनी केला. 


प्रास्ताविकात नगराध्यक्ष राऊत यांनी कर्जतकरांचा पाण्याचा संघर्ष, विशेष करून महिलांची होणारी परवड मांडली. राजकारण न करता सर्व नगरसेवकांना एकत्र घेत चांगले काम उभारण्याचा प्रयत्न आपण केला. नगरपंचायतीसाठी मंत्री शिंदे यांनी ७५ कोटींचा निधी उपलब्ध केला, असे ते म्हणाले. यावेळी खासदार दिलीप गांधी, अशोक खेडकर, स्वप्निल देसाई, सुरेश खिस्ती, प्रसाद ढोकरीकर यांचीही भाषणे झाली. 


मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सभापती पुष्पा शेळके, रामदास हजारे,अलाउद्दीन काझी, आरपीआयचे संजय भैलुमे, विजय तोरडमल, सुभाष तनपुरे, रवि सुरवसे, महेश निमोणकर, दीपक शहाणे, उमेश जेवरे, विनोद दळवी, कार्यालयीन प्रमुख संतोष समुद्र, नगरसेवक सुधाकर समुद्र, संदीप बारबडे, सचिन घुले, सोमनाथ कुलथे, तारेक सय्यद, लाला शेळके, नगरसेविका प्रतिभा भैलुमे, नीता कचरे, वृषाली पाटील, राखी शहा, राणी गदादे, मंगल तोरडमल, मनीषा सोनमाली, उषा राऊत-मेहत्रे, पूजा मेहत्रे, हर्षदा काळदाते, मोनाली तोटे उपस्थित होते. स्वागत उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, सूत्रसंचलन नीलेश दिवटे, अशोक सूर्यवंशी यांनी, तर आभार मुख्याधिकारी पिंजारी यांनी मानले. 


पाणीदार माणूस 
ज्याच्या नावात 'राम', त्याच्या कामातसुद्धा 'राम' आहे, असे म्हणत मंत्री रणजीत पाटील यांनी पालकमंत्री राम शिंदे यांचे कौतुक केले. ज्यांनी विरोधकांनाही सोबत घेऊन कर्जत शहराला शुद्ध पाणी दिले, ते नगराध्यक्ष नामदेव राऊत हे पाणीदार माणूस आहेत, असे सांगत उपस्थित जनसमुदायासमोर दोघांच्या पाठीवर पाटील यांनी कौतुकाची थाप टाकली. 


सांस्कृतिक भवन हवे 
कर्जत शहरात मनोरंजनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी मंत्री रणजीत पाटील यांनी आपल्या विभागामार्फ़त शहरासाठी वातानुकूलित सांस्कृतिक भवन देण्याची मागणी मंत्री राम शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली. कर्जत नगरपंचायत हद्दीतील बर्गेवाडी-गायकरवाडी पाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावे, असे साकडेही त्यांनी घातले.