आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ‘एएमटी’ बससेवा व्हेंटिलेटरवर; बसथांब्यातील खुर्च्या चोरीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरात मोठ्या प्रयत्नांतून अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेली शहर बससेवा शेवटची घटका मोजत आहे. बससेवेसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. शहर बसस्थानकांतील, थांब्यातील लोखंडी खुर्च्या चोरीला गेल्या आहेत. त्यातच मनपाकडून बससेवेला अपेक्षित असलेले दरमहा पाच लाखांचे अनुदान बारा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे बससेवा सुरू ठेवणे ठेकेदारासमोर आव्हान बनले आहे. जर परिस्थिती बदलली नाही, तर अथक प्रयत्नांनंतर सुरू झालेली ही बससेवा कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. त्याचे खापर सत्ताधाऱ्यांसह मनपा प्रशासनावर फुटणार आहे. 


प्रसन्न पर्पलतर्फे नगर शहरात सुरू असलेली शहर बससेवा तोट्यात गेल्याने बंद करण्यात आली होती. तशाच अडचणींना सध्याच्या एजन्सीलाही सामोरे जावे लागत आहे. शहरात बससेवा सुरू करताना ३० ते ३५ बसगाड्या सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानंतर २१ बस रस्त्यावर धावू लागल्या होत्या. परंतु तोटा वाढत असल्याने अवघ्या १६ बस सध्या रस्त्यावर धावत आहेत. विखे फाउंडेशन, पाइपलाइन रस्ता, माळीवाडा बसस्थानक, दिल्ली दरवाजा, न्यू आर्ट कॉलेज, एमआयडीसी, विळद आदी मार्गांवर बससेवा सुरू असली, तरी केडगावकरांना बससेवा मिळत नाही. 


मनपाने या बसच्या डेपोसाठी जागा देण्याचे मान्य केले होते, पण अजूनही जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीला भाडेतत्त्वावर जागा घ्यावी लागली. त्यापोटी एजन्सीला दरमहा पन्नास हजार रुपये मोजावे लागतात. एकीकडे मनपाने थकवलेले अनुदान, तर दुसरीकडे तोटा वाढता खर्च यामुळे एमटी व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. एएमटी अधिकृत बसथांब्यावर कधीच थांबत नाहीत. कारण थांब्यांची दुरवस्था झाल्याने प्रवासी तेथे थांबत नाहीत. थांब्यांसमोर बस थांबत नसल्याने ही ठिकाणे टवाळांचा अड्डा बनली आहेत. पिवळे पट्टेही या परिसरात मारले गेले नाहीत. दरम्यान, हक्काची खिशाला परवडणारी शहर बससेवा कोलमडल्याने हजारो प्रवाशांना दररोज खासगी रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. रिक्षाचालक देखील प्रवाशांचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने शहर बससेवेच्या अडचणी सोडवून या सेवेला नवसंजीवनी देण्याची गरज असल्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत. 


रिक्षाचालकांची दादागिरी वाढली 
माळीवाड्यात जिल्हा परिषद कार्यालयालगत शहर बससेवेचे नियंत्रण कक्ष आहे. या ठिकाणी बेकायदेशीर रिक्षा पॅगोचालकांच्या दादागिरीचा त्रास प्रवाशांसह बससेवेला सहन करावा लागतो. बऱ्याचदा दमदाटीही केली जाते. हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिस प्रशासनाने बेकायदेशीर वाहतुकीला लगाम लावण्याची गरज व्यक्त होत आहे. 


केडगाव, भिंगारला बस केव्हा? 
नगर शहरात ३० ते ३५ बसगाड्यांची गरज असताना, अवघ्या १६ बसच्या मदतीने शहरात प्रवासी वाहतूक सेवा दिली जात आहे. केडगावसारख्या सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या उपनगराला अजूनही ही सेवा मिळालेली नाही. येथील नागरिकांना अद्याप या बससेवेची प्रतीक्षाच आहे. तसेच भिंगारमधून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, पण त्यांनाही चांगली सेवा अजून मिळत नाही.

 
मनपाचे अधिकारी करतात काय? 
एएमटीवर नियंत्रण ठेवणारे महापालिकेचे अधिकारी तर उदासीन अाहेतच. शिवाय आयुक्तांचेही या महत्त्वपूर्ण सेवेकडे दुर्लक्ष झाले आहे. जर ही बससेवा बंद पडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न शहरातील जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांकडून शहर बससेवेची मागणी वाढत आहे, पण सेवा देण्यात एजन्सीला अडचणी येत आहेत. केडगावकरांना शहर बससेवेची नितांत गरज असताना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. 


मोडकळीस आल्या आहेत बहुतेक बसगाड्या 
शहरातीलबसगाड्यांची अवस्था विदारक झाली आहे. बसमधील खुर्च्या तुटलेल्या आहेत. काही बसला तर एकच हेडलाईट आहे. िखडक्यांवर असलेले हँडलही तुटलेले आहे. बस मोडकळीस आल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बसची देखभाल दुरुस्ती करून चांगली सेवा मिळावी, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. 


या शहर बसला दिवेदेखील नाहीत. वाहतूक नियम धाब्यावर बसवून या बस शहरात धावत आहेत. ठेेकेदार एजन्सीने बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने बस मोडकळीस आल्या आहेत. 


आमच्या अडचणी दूर कराव्यात 
आम्हाला शहर बससेवा चालवताना महापालिकेकडून दिले जाणारे अनुदान बारा महिन्यांपासून थकले आहे. ही रक्कम सुमारे ५५ ते ६० लाख रुपये आहे. हे अनुदान तातडीने अदा करावे. बस उभ्या करण्याकरिता डेपोसाठीच्या जागेचा प्रश्नही मार्गी लावायला हवा. बस थांब्यातील खुर्च्या सुस्थितीत असायला हव्यात. जर ही परिस्थिती बदलली नाही, तर योग्यवेळी निर्णय घेऊ.'' धनंजयगाडे, संचालक, यशवंत अॉटो प्रा. लिमिटेड, अहमदनगर. 


बसथांबे पडलेत अडगळीत 
शहरात दिल्ली दरवाजा, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, बंगाल चौकी, कोठी रस्ता आदी महत्त्वपूर्ण ठिकाणी शहर बससेवेचे थांबे आहेत. या थांब्यांमधील खुर्च्या चोरीला गेल्या आहेत, तसेच मोडतोडही झाली आहे. थांब्यांना जाहिरातींच्या फलकांचा वेढा पडला असून या ठिकाणी प्रवाशांऐवजी मोकाट जनावरे टवाळखोरांचीच वर्दळ असते. 

बातम्या आणखी आहेत...