आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: एसपी ऑफिसच्या जवळच चालते अंडा गँगची दहशत, पोलिसांकडूनच मिळते पाठबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहर व जिल्ह्याची कायदा -सुव्यस्था जेथून राखली जाते, त्या पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळच कुख्यात अंडा गँगची मोठी दहशत आहे. या टोळीने मुकंुदनगर व शहराच्या वेगवेगळ्या भागात अनेक गुन्हे केले आहेत. अमली पदार्थांच्या नशेत नेहमी तर्रर्र असणारे टोळीतील आरोपी आता थेट महिलांवरच हात टाकत आहेत. या टोळीच्या विरोधात मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. परंतु मोक्का तर दूरच, उलट या आरोपींना पाठबळ देण्याचे काम पोलिस करत आहेत. 


समीर जाफर खान उर्फ सॅम, जैद रशीद सय्यद उर्फ टायप्या, खान मुजीब अजिज उर्फ भुऱ्या, मुदस्सर अजिज खान उर्फ कल्लू, दानिश तामटकर अशी अंडा गँगमधील प्रमुख आरोपींची नावे आहेत. नगरसेवक समद खान वहाब याचेही नाव या गँगशी जोडले जात आहे. समद हाच टोळीसाठी लागेल ती रसद पुरवत असल्याचे येथील नागरिकांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. समद याच्या विरोधात भिंगार कॅम्प व तोफखाना पोलिस ठाण्यात तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बलात्कार, विनयभंग, खंडणी, अवैध हत्यारे, लूटमार, तसेच अंमली पदार्थांची विक्री हा या टोळीचा प्रमुख धंदा आहे. त्यातील आरोपी जैद रशीद उर्फ टायप्या याने नुकतेच एका महिलेचे तिच्या आई- वडिलांसमोरच अपहरण केले, तिच्यावर अत्याचारही केला. पीडित मुलीने फिर्याद देताच फरार झाला. पोलिस दप्तरी फरार असलेला टायप्या मुकंुदनगर परिसरात राजरोसपणे फिरत आहे. तक्रार मागे घेण्यासाठी तो आता पीडित महिलेच्या कुटुंबाला धमकावत आहे. आरोपी भुऱ्या, कल्लू व सॅम यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तडीपार असुनही हे आरोपी मुकुंदनगर परिसरात वावरतात. हे तिन्ही आरोपी नगरसेवक समद खान याचे भाचे असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. समद खान याच्यासह आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मुकुंदनगर येथील नागरिकांची मागणी आहे. परंतु पोलिसांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने अंडा गँगची दहशत वाढली आहे. 


न्यायालयाकडे दाद मागणार 
अंडा गँगमधील आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मागील तीन वर्षांपासून आम्ही करत आहोत. मात्र, पोलिस प्रशासन त्याबाबत कार्यवाही करत नाही. आरोपींविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर तत्काळ कारवाई झाली नाही, तर पोलिस प्रशासनाविरोधात न्यायालयाकडे दाद मागू.
- अर्शद शेख, अध्यक्ष, पीस फाउंडेशन. 


पीडितेच्या कुटुंबाला टायप्याच्या धमक्या 
अंडा गँगमधील जैद रशीद ऊर्फ टायप्या याने मुकुंदनगरमधील एका विवाहितेचे तिच्या आई- वडिलांसमोरच अपहरण केले. दिल्लीगेट परिसरातील एका घरात तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून टायप्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होताच टायप्या फरार झाला. आता तो पीडितेच्या कुटंुबीयांना वारंवार धमक्या देत आहे. 

 

तडीपार असूनही आरोपी मुकुंदनगरमध्येच 
भिंगार कॅम्प व कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी समीर जफर खान ऊर्फ सॅम याच्या विरोधात तीन, विवाहितेचे अपहरण करणारा टायप्या याच्या विरोधात दहा, मुजीब ऊर्फ भुऱ्या याच्या विरोधात आठ, तर मुदस्सर ऊर्फ कल्लू याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात सॅम, भुऱ्या व कल्लू हे तिघे तडीपार आहेत. मात्र, तडीपार असूनही हे आरोपी अनेकवेळा मुकुंदनगर परिसरात येऊन दहशत निर्माण करतात. 


टायप्याच्या तडीपारीचा प्रस्ताव 
विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी टायप्याचा शोध सुरू आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून आता तडीपारीचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. अंडा गँगमधील इतर आरोपींचे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येईल. कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही.
- संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, भिंगार कॅम्प. 

बातम्या आणखी आहेत...