आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणात जातपात आणू नका, शंभरीतील खताळांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - जातिभेद मी कधीच मानला नाही. त्याकाळी अतिशय कर्मठ वातावरण असताना पुढाकार घेत ब्राह्मण-दलित असा आंतरजातीय विवाह घडवून आणला. माझी मुले, नातवंडांनीही आंतरजातीय लग्ने केली. जातपात संपली असे वाटत असतानाच आज पुन्हा जात-पात डोके वर काढत असल्याने वाईट परिस्थिती निर्माण होत असल्याची खंत व्यक्त   करत राजकारणात जातपात न आणण्याचा सल्ला ज्येष्ठ विचारवंत व राज्याचे माजी मंत्री डॉ. बी. जे. खताळ यांनी राज्यकर्त्यांना दिला. 

 

शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल शनिवारी मालपाणी लॉन्सवर खताळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते. शिक्षणतज्ज्ञ डॉ. मोरेश्वर गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. सप्तर्षी यांच्या हस्ते खताळ यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र देण्यात आले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. संजय मालपाणी, युटेक साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले, डॉ. राजेंद्र पिपाडा, दशरथ सावंत यावेळी उपस्थित होते. 


खताळ म्हणाले, सर्व जाती-धर्मांच्या मित्रांसोबत वाढलो. कधी भेदभाव केला नाही. आता मात्र जात पुन्हा डोके वर काढते आहे. पक्ष कोणताही असू द्या, जाती-पातीचे राजकारण करु नका. हा देश भारतीयांचा आहे. नातू विक्रम यांना राजकारणात पुढे आणण्याची मागणी झाल्यानंतर तो धागा पकडत खताळ म्हणाले, कोणीही राजकारणात स्वकर्तृत्वाने पुढे यायला हवे. माझी पुण्याई घेऊन कुटुंबातील काेणी पुढे यावे, या मताचा मी नाही. 


सरकारने पद्मश्री देण्यासंदर्भातील उल्लेखाचा धागा पकडत खताळ यांनी कोणत्याही उपाधीने माणसं मोठी होत नसतात. कोणती उपाधी नसताना गौतम बुध्द, संत ज्ञानेश्वर, सावरकर, नेहरु, गांधी मोठे झालेच ना, असा प्रश्न करत आपण अशा कोणत्याच पुरस्कारासाठी इच्छूक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजात आज ५ टक्के सच्चे, ५ टक्के लुच्चे आणि ९० टक्के कच्चे लोक आहेत. ते वाऱ्याच्या दिशेने विचार बदलणारे असतात. मात्र, काही गोष्टी चिरंतन असतात. त्याचे आजचा कार्यक्रम एक उदाहरण आहे. आपल्याच पायात बेड्या घालणारे मी आणि खताळ दोन वेडे असल्याचे बाळासाहेब विखे म्हणत. दादांनी आयुष्यभर गांधीवाद जोपासला. खरा गांधीवादी शंभर वर्ष जगतोच. ऊन लागल्यावर झाडाची सावली जशी आश्वासक वाटत असते, तसे खताळ हे आश्वासक झाड आहे,असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले. डॉ. गोसावी यांचेही भाषण झाले. शाळीग्राम होडगर यांनी प्रास्ताविक केले, तर साहेबराव वलवे यांनी आभार मानले. 


शंभरीत पदार्पण करणारे माजी मंत्री डॉ. बी. जे. खताळ यांचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अभीष्टचिंतन केले. समवेत पालकमंत्री राम शिंदे व गोखले एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डाॅ. मोरेश्वर गोसावी. छाया : प्रसाद सुतार. 


जीवनाला कलाटणी देणारे विचार 
पारदर्शी, स्वच्छ व निरोगी आयुष्य दादा जगले. हा परिसर त्यांच्या विचारांनी भारलेला आहे. त्यांनी आयुष्यात जनतेसाठी जे काम केले, त्याला सलाम करण्यासाठी जमलेली ही गर्दी आहे. त्यांचे विचार जीवनाला कलाटणी देणारे आहेत. त्यांनी साखर कारखान्याची निर्मिती केली, म्हणून आज हा तालुका सुजलाम झाला आहे. त्यांचे आचार आणि विचार आचरणात अाणून समोरच्याला जबाबदारीने वागायला शिकवण्याची गरज आहे.'' राम शिंदे, पालकमंत्री. 

बातम्या आणखी आहेत...