आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वॉटर कप' स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बोंदर्डीची आघाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरजगाव- पाणी फाउंडेशच्या वाटर कप स्पर्धेत कर्जत तालुक्यातील ४१ गावांनी भाग घेतला आहे. बोंदर्डी गावाने पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करून १५ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे जैन संघटनेने येथील ग्रामस्थांना २०० तासांसाठी पोकलेन मशीन दिले. 


या कामाचे उद््घाटन तहसीलदार किरण सावंत यांच्या हस्ते झाले. या वेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, सरपंच नितीन खेतमाळस, जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष अभय बोरा, अमृत लिंगडे, रोटरी क्लबचे नितीन देशमुख, पाणी फाउंडेशनचे अमोल लांडगे, ग्रामविकास अधिकारी शरद कवडे, पोपटलाल बोरा, आदिराज प्रतिष्ठानचे बबनराव दळवी, राजेंद्र गोरे, अर्चना गोरे, मीना फरताडे, कविता म्हस्के, आशिष बोरा, नितीन बनकर, विजय पवार, जमशेद शेख, जयदीप जगताप, बबन म्हस्के, सलिम आतार, किरण नहार, प्रशांत सोनवणे, संजय घोडके, विशाल म्हस्के, प्रियंका बनकर, उद्धव फरताडे, वर्षा म्हस्के, कविता म्हस्के, शरद थोरात, जयदीप जगताप यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 


बोंदर्डी परिसरातील जमिनीचे माती परीक्षण झाले आहे. गावातील सर्व घरांसाठी श्रमदानातून शेषखड्डे तयार करण्यात आले आहेत. रोपवाटिकेच्या माध्यमातून अडीच हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. संपूर्ण परिसर आगपेटीमुक्त करण्यात आला आहे. जुन्या रचनांचे सर्वेक्षण करून ७ लूज बोल्डर स्ट्रक्चर, श्रमदानातून कंपार्ट बंधारे तयार करण्यात आले आहेत. समतल चार श्रमदानातून करण्यात आले. या गावातील प्राथमिक पातळीवरील सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याने सर्व गुण मिळवून गावाने प्रथम क्रमांक मिळवला. यापुढे बोंदर्डी परिसरातील ओढे व नाले खोलीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जैन संघटनेने जेसीबी व पोकलेन मशीन दिले आहे. 


वाॅटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४२ गावांनी भाग घेतला आहे. प्रत्येक गावातील पुरुष व महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. मात्र, बहुतांशी गावे सक्रिय होत नव्हती. जैन संघटनेने गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. श्रमदान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे या गावांनी आपला सहभाग नोंदवला. दुष्काळी असणाऱ्या व सतत पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या तालुक्यात नव्याने जलक्रांती सुरू झाली आहे. 


...तर दुष्काळ कायमस्वरूपी हटेल 
दुष्काळ हटवण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या उर्वरित गावांनीही श्रमदान करून आपले पहिल्या टप्प्यातील गुण संपादन करून मोठ्या कामांसाठी मशीन मिळवणे गरजेचे आहे. या संधीचा फायदा प्रत्येक गावाने घेतला, तर दुष्काळ कायमस्वरूपी हटेल. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी ओळखून श्रमदान केले पाहिजे. 
-  किरण सावंत, तहसीलदार, कर्जत. 


लोकांवरच गावाचे भवितव्य अवलंबून 
कर्जत तालुक्याने यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जल संवर्धनाचे फायदे पाहिले आहेत. ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली, त्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवत नाही. भर उन्हाळ्यात पिके डोलताना दिसत आहेत. प्रत्येक गावाचे भवितव्य तेथील लोकांवरच अवलंबून आहे. गावातील प्रत्येक घटकाने श्रमदान करून दुष्काळ हटवला पाहिजे.
- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, कर्जत. 

बातम्या आणखी आहेत...