आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन पोकलेनसह वाळू वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेरमध्ये जिल्हा गौण खनिज पथकाने कारवाई केली. पथकाने पकडलेली वाहने आणि वाळूसाठा. - Divya Marathi
पारनेरमध्ये जिल्हा गौण खनिज पथकाने कारवाई केली. पथकाने पकडलेली वाहने आणि वाळूसाठा.

संगमनेर- जिल्ह्यातील नदीपात्रांतून सुरू असलेली वाळूतस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. बुधवारी महसूल खात्याच्या नगरच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पारनेर तालुक्यात छापे टाकले. नदीपात्रातून बेकायदा वाळू उत्खनन करताना पथकाने तीन पोकलेनसह वाळू वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडले. याशिवाय सुमारे पन्नास ब्रास वाळूसाठेही ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांतील ही मोठी कारवाई आहे. संगमनेरमध्ये मात्र अजून अशी कारवाई झालेली नाही. 


एकीकडे वाळूच्या लिलावांना प्रतिसाद मिळत नसताना दुसरीकडे जिल्ह्यात वाळूतस्करी जोरात सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदा वाळू वाहतुकीचे कंबरडे मोडण्यासाठी पावले टाकली आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे, कर्मचारी अशोक मासाळ यांनी बुधवारी कोणालाही सुगावा लागू देता पारनेर गाठले. नायब तहसीलदार दत्तात्रेय भावले आणि पप्पू भिंगारदिवे यांना बरोबर घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे बेकायदा वाळूचे उत्खनन होत असलेल्या अळकुटीचा भंडारीमाळ, राणूबाईचा आेढा, गारखिंडी येथे छापे टाकण्यात आले. तेथे पोकलेनच्या साहाय्याने वाळूउपसा होत असल्याचे आढळून आले. पथकाला बघून वाळूतस्करांची धावपळ उडाली. वाहने तेथेच सोडून त्यांनी तेथून पळ काढला. 


दोन पोकलेन आणि वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागले. गारखिंडीतील कारवाईवेळी जवळच सुमारे सात ब्रास वाळूचा साठा सापडला. पथकाने पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांना यासंदर्भात माहिती देत महसूल विभागाचे अधिकारी, सर्कल, तलाठी घटनास्थळी बोलावून घेतले. पकडलेली वाहने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देत वाळू उत्खनन झालेल्या ठिकाणांचे मोजमापे घेण्याचे आणि पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. 


पथकातील अधिकारी या भागातील कारवाई संपवून जात असताना त्यांना हंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच तेथे जात पाहणी केली असता तेथेही पोकलेनच्या साहाय्याने दोन ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक सुरू असल्याचे आढळले. पथकाने ही वाहनेही ताब्यात घेतली. यावेळीही वाळूतस्कर वाहने सोडून पसार झाले. तेथे पन्नास ब्रास वाळूसाठा पथकाला आढळला. पथकाने केलेल्या कारवाईमुळे मोठी वाळूतस्करी आणि वाळूतस्कर महसूलच्या रडारवर आले आहेत. 


वाहन मालकांना पाचपट दंड करणार 
कारवाई दरम्यान पकडलेली वाहने तहसीलदार भारती सागरे यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. संबंधित वाहनांचे मालक निष्पन्न करून त्यांच्यावर पाचपट दंडात्मक कारवाई केली जाईल. याशिवाय वाळू उत्खनन झालेल्या ठिकाणी मोजमापे करण्याच्या सूचना तलाठी, सर्कल यांना देण्यात आल्या आहेत. मोजमाप झाल्यानंतर त्या ठिकाणच्या वाळू उत्खननाचे मोजमाप करून त्याचादेखील दंड केला जाईल.
- संजय बामणे, जिल्हाखनिकर्म अधिकारी, नगर. 

बातम्या आणखी आहेत...