आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ विचाराचे केंद्र व राज्यातील भाजप सरकार कामगार विरोधी; कॉम्रेड भालचंद्र कांगो यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- देशातील भाजप सरकारने काळ्या पैशाच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यांत धुळफेक केली आहे. ज्यांनी मोदींना निवडणुकीत आर्थिक मदत केली आहे, त्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अदानी, अंबानी सारख्या उद्योजकांना शरण गेलेले हे जातीयवादी, धर्मांध लोकांचे हे सरकार आहे. मोदी व संघ विचाराचे हे भाजपचे सरकार कामगार विरोधी आहे. या सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे तंबाखू, विडी कामगार व्यवसायावर मोठे संकट आले. देशातील ५ कोटी कामगार बेरोजगार होणार आहेत. सरकारने यांचे पुनर्वसन केले पाहिजे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी केले. 


महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे १२ वे राज्य अधिवेशन येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात कॉ. डॉ. कांगो यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्य विडी सिगार कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. कारभारी उगलेे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड, कॉ. सुभाष लांडे, कॉ. श्याम काळे, काॅ. राजू देसले, महिला फेडरेशनच्या अध्यक्षा स्मिता पानसरे, कॉ. ज्योती नटराजन, नगराध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, विडी सिगार कंपनीचे मालक प्रतिनिधी चंपालाल चोरडिया, भाऊसाहेब पवार, भास्कर नवले आदी उपस्थित होते. 


कांगो म्हणाले, विडी कामगारांच्या प्रश्नात अकोले, संगमनेरचे योगदान कायम राहिलेले आहे. विडी कामगारांच्या मुला-मुलींचे मोफत शिक्षण झाले पाहिजे. दरमहा पेन्शन ३५०० रुपये मिळालेच पाहिजे. विडी कामगारांना पिवळे रेशनकार्ड मिळावे, घरकुल योजनेतून घरकुल मिळावेत, या आमच्या मागण्या आहेत. येणाऱ्या काळात विडी कामगारांचे प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित होताना जुने धंदे मरतात, असे असले तरीही या मरणाऱ्या धंद्याना सरकारने मदत करण्याचे काम केले पाहिजे. मागच्या २०१४ च्या निवडणुकीत आलेले हे सरकार केवळ सत्ताबदल नसून जाती धर्मावर चालणारे अभद्र सरकार आहे. तेव्हा या सरकारला २०१९ च्या निवडणुकीत "मोदी चले जाव, भाजप हटाव" ची हाक द्यावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करून याची सुरुवात आजच्या अधिवेशनात करू या, असे आवाहन कॉ. कांगो यांनी केले. 


माजी मंत्री पिचड म्हणाले, आपण मंत्री असताना विडी कामगारांना जे शक्य असेल ते देण्याचे काम केले. शेतकरी, कष्टकरी, कामगारांची बांधिलकी जपण्याचे काम आपण केले. याउलट हे भाजप सरकार आहे. साखर व्यवसाय अडचणीत असताना आपल्या शत्रू राष्ट्राची, म्हणजेच पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. शत्रूराष्ट्राचे गोडवे गात आहेत. 


यावेळी काॅ. स्मिता पानसरे, कॉ. राजू देसले, चंपालाल चोरडिया, भाऊसाहेब पवार यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या दुटप्पी धोरणाबाबत टीका केली. कॉ. कारभारी उगले यांनी तंबाखू, विडी कामगारांचे संघटन, संघटनेचे कार्य व येणाऱ्या काळातील विडी कामगारांच्या प्रश्नावर करावायच्या अांदोलनाच्या भूमिकेबाबत माहिती दिली. संघटनेने संघर्षातूनच आजपर्यंत सर्व मिळवले आहे ते टिकवण्यासाठी संघर्ष अटळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. आभार काॅ. शांताराम वाळुंज यांनी मानले. 


समृद्धी महामार्ग नको, गावोगावी रस्ते द्या 
देशात गोमांस, जाती धर्माच्या नावाखाली दंगली घडवून आणल्या जात आहेत. फडणवीस सरकार आम्हाला समृद्धी महामार्ग नकोत, तर खेड्यापाड्यात, गावोगावी रस्ते बनवून द्यावेत. मात्र, ते होत नसल्याने सर्वत्र खड्डे पडले आहेत. आता या एेतखाऊ भाजपचे सरकार घालवण्यासाठी समविचारी लोकांनी व पक्षांनी एकत्र अाले पाहिजे, असेही आवाहन पिचड यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...