आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल गुन्हेगार तुरुंगात, तरी लुटमार सुरूच; शहरासह जिल्हाभर गुन्हेगारीत वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गेल्या दीड वर्षात सव्वाशेपेक्षा अधिक अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यापैकी बहुतांश गुन्हेगार तुरूंगात आहेत. मात्र, असे असतानाही शहरासह जिल्हाभरात लूटमार, धमकी, घरफोड्या, तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. भरदिवसा लाखो रुपयांची चोरी होते, तरी पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. एका पत्रकाराला हात-पाय तोडण्याची धमकी, तर अन्य एका पत्रकाराला धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार नुकताच घडला. 


दैनिक दिव्य मराठीचे वार्ताहर दीपक कांबळे यांना गुरूवारी पहाटे नगर-पुणे रस्त्यावरील चास शिवारात तिघांनी लुबाडले. धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील १२ हजार ९०० रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले. एक दिवस अाधी पत्रकार आदिनाथ शिंदे यांना अज्ञात व्यक्तींनी हात-पाय तोडण्याची धमकी दिली. पाळत ठेवून पैसे असलेली पिशवी पळवणे, घरफोडी, गंठणचोरी, तसेच रस्तालुटीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. पोलिस मात्र सव्वाशेपेक्षा अधिक अट्टल गुन्हेगारांना अटक केल्याचा दावा करत आहेत. पोलिस मोठ्या गुन्ह्यातील आरोपींच्या मागे असले, तरी दुचाकी, मोबाइल, तसेच पैशांची पिशवी पळवण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


केवळ शहरच नाही, तर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत लूटमार व घरफोडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. 


मोठ्या गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद 
राज्यभर कुख्यात असलेली चन्या बेग टोळी, शिंगणापूर येथील गणेश भुतकर हत्याकांड, शेवगाव येथील हारवणे हत्याकांड, संदीप वराळ खून, राहुरी येथील हिंमत जाधव खून, अस्तगाव येथील दरोडा, अॅड. रियाज पठाण खून यासारख्या अनेक गुन्ह्यांमधील आरोपींना तुरुंगात डांबण्याचे काम पोलिसांनी केले. मात्र, बनावट दारू, गोमांस विक्री, घरफोडी, तसेच दुचाकी व मोबाइल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. 


रस्तालुटीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ 
शहरातून जाणारे महामार्ग, शहर, तसेच वारंवार गुन्हे घडत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस पेट्रोलिंग करतात. संबंधित स्थानिक पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, नियंत्रण शाखा अशी वेगवेगळी पथके पेट्रोलिंग करतात. असे असतानाही रस्तालूट, घरफोडी, दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होण्याएेवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...