आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाकू बंदुकीने लुटतो, डॉक्टर इंजेक्शनद्वारे! मानसोपचार तज्ञ डॉ. तोडकर यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणी- रोगाचे निदान आणि उपचार करणाऱ्या सर्वच पॅथी चांगल्या आहेत. मात्र, अलीकडे या व्यवसायाचे बाजारीकरण झाले अाहे. पेशंटची होणारी लूट पाहिली, तर डॉक्टर आणि डाकू यामध्ये फरक राहिलेला नाही. फक्त डाकू बंदुकीने लुटतो, तर डॉक्टर इंजेक्शनद्वारे, असे कोल्हापूर येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वागत तोडकर यांनी सांगितले. 


घरगुती उपचार या विषयावर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. तोडकर बोलत होते. बन्सी पाटील तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात व्ही. आर. राठी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तोडकर म्हणाले, आज ज्याचे आरोग्य चांगले, तोच माणूस श्रीमंत समजावा. निरोगी राहायचे असेल, तर नेहमी आनंदी राहायला शिकले पाहिजे. निरोगी जीवन जगण्यासाठी निसर्गाने भरभरून दिले असतानाही आपण त्याचा अभ्यास करत नाही. पैशांच्या मागे धावताना व्यसनाला जीवन समजून हसण्यात लपलेला जीवनाचा खरा आनंद विसरून गेल्याने प्रत्येकजण मृत्यूच्या भीतीने रोजच मरतो आहे, अशी खंत व्यक्त करत निसर्गात मोफत उपलब्ध असलेल्या वनस्पतींच्या सेवनाने विविध रोग कसे बरे करायचे, हे त्यांनी सांगितले. 


कधी अस्तित्वात नसलेला थॉयराइड हा आजार आज मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. पूर्वी महिलांच्या कंठावर असलेले सोन्याचं मंगळसूत्र आज खाली खाली उतरत चालले आहे, तर कुंकवाची जागा टिकलीने घेतली आहे. या गोष्टी वापरण्यामागेही त्या काळी विज्ञान होते. आज या गोष्टी मागे पडत चालल्याने आजार वाढत आहेत. नुसत्या बांगड्या वापरल्या तरी सीझर टाळता येते, असे त्यांनी सांगितले. नारळाची मुळी रात्रभर भिजत ठेवून ते पाणी सकाळी कोमट करून प्यायल्यास थॉयराइड बरा होतो. आजकाल खूप कमी वयात चष्मा लागताे. विड्याच्या पानांचा रस काही थेंब डोळ्यात घातल्यास चष्मा कायमचा घालवता येतो. खसखस आणि खडीसाखर दिवसातून पाच वेळा खाल्ली तरी कंबरदुखी आणि गुडघेदुखी कायमची दूर होऊ शकते, असे डॉ. तोडकर म्हणाले. 


पेरू आणि आंब्याच्या पानांतून दाताचे रोग, केसाच्या गळतीवर लिंबाचा रस, तर मुळ्याच्या रसाने दात निरोगी आणि घट्ट होतात. पित्त आणि हार्ट अॅटॅकची लक्षणे सारखीच असल्याने यातील बहुतेक लोक हे केवळ भीतीने मरतात. दररोज सकाळी उठल्यानंतर एक पाकळी लसणाची खाल्ली तरी ब्लॉकेज निघून जातात. अस्वस्थ वाटायला लागले तर घाबरून जाता आल्यावर लिंबू पिळून चवीपुरते मीठ खाल्ले तरी अस्वस्थता कमी होते. तुळशीच्या पानांतही ऑक्सिजन भरपूर प्रमाणात असल्याने चार पाने चावून खाली तरी थोड्या वेळाने हार्ट अॅटॅक नसल्याची जाणीव होऊन घाबरून मरणे टळू शकते, असे ते म्हणाले. 


आजार होऊच द्यायचे नसतील तर आपली जीवनशैली बदलण्याची गरज असल्याचे सांगताना डॉ. तोडकर म्हणाले, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. झोपण्यापूर्वी जेवण केल्यानंतर अर्धा तास तरी पाणी पिऊ नका. थोडा गुळाचा खडा चघळून घोट घोट पाणी प्यायल्यास शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आभार डॉ शशिकांत कुचेकर यांनी मानले. 

 

छावा म्हणवणाऱ्यांच्या तोंडात मावा... 
पूर्वी निसर्गातील गोष्टींचा वापर केला जात असे. घरातून किंवा शाळेतून या गोष्टी शिकवल्या जात. परंतु सोशल मीडियाच्या आजच्या युगात मास्तरलाच आज कोमात घालण्याची भाषा केली जाते. आजच्या तरुणाच्या वजनाइतकी तलवार चालवणाऱ्या शंभुमहाराजांचे नाव घेऊन स्वतःला शंभूचा छावा म्हणवणाऱ्यांच्या तोंडात मात्र मावा असतो, असे सांगत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन डॉ. तोडकर यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...