आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार तास मृत्युशी अपयशी झुंज; पण बाळाचे तोंडही पाहिले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका विवाहित महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. बाळाला जन्म दिल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत चार तास तिने मृत्यूशी अपयशी झुंज िदली. बाळाचे तोंड न पाहताच तिने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ज्योती योगेश शिरसाठ (३१, पिंपळगाव टापा, ता. पाथर्डी) असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणा केल्यामुळे ज्योतीचा मृत्यू झाला, तिचे शवविच्छेदन करण्यासाठीही प्रशासनाने सहकार्य केले नाही, असा आरोप तिच्या भावाने केला आहे. 


ज्योती शिरसाठ यांना प्रसुतीसाठी काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरच्या लोकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी दुपारी त्यांची प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रसुत होऊन त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे ज्योती बेशुद्ध होती, असे तिच्या आईने सांगितले. त्यानंतर चार तास ती बेशुद्धच होती. नंतर रात्री उशिरा ती मृत झाल्याचे प्रशासनाने नातेवाईकांना सांगितले. बाळाची तब्येतही नाजूक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. 


रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ज्योतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री उशिरा ज्योतीच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही. सकाळपर्यंत ज्योतीचा मृतदेह तपास पडून होता. सकाळी आणखी नातेवाईक आल्यानंतर ज्योतीच्या भावाने तिचे शवविच्छेदन औरंगाबाद किंवा पुण्याला करण्याचा आग्रह धरला. तिच्या मृत्यूचे कारण समोर येण्यासाठी हे गरजेचे असल्याचे तो म्हणाला. मात्र तरीही रुग्णालय प्रशासन व पोलिसांनी सहकार्य केले नाही. 


दरम्यान, या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेतली. दुपारी एक वाजेपर्यंत ज्योतीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवलेला होता. एव्हाना गावाकडे तिच्या मृत्यूची वार्ता पसरली होती. त्यामुळे रुग्णालयात असलेल्या तिच्या भावाला, सासरच्या लोकांना विचारणा होऊ लागली. अखेर दबावापोटी तिच्या सासरच्या लोकांनी नगरमध्येच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्यांच्याकडून याबाबत काहीही तक्रार नसल्याचे लेखी घेतले, असेही तिच्या भावाने सांगितले. 


ज्योतीच्या माहेरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वृद्ध माता-पिता व भावासोबत ती रहात होती. दीडेक वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मृत्यूनंतरही तिच्या वाट्याला उपेक्षाच आली, अशी प्रतिक्रिया जिल्हा रुग्णालयात आलेले तिचे नातेवाईक व्यक्त करत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित, पत्रकार व नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी नातेवाईकांकडून तक्रार नसल्याचे लिहून घेतल्याने सर्वांना निघून जावे लागले. 


पोलिसाचा हटवाद 
ज्योतीच्या मृत्यूबद्दल तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पत्रकारांना माहिती दिली जात नव्हती. तिच्या नातेवाईकांनी तक्रार करायची असल्याचे म्हटल्यावर त्यांना नकार मिळाला. ज्योतीचा मृतदेह शवागृहात कुलूपबंद करण्यात आला. रुग्णालय ड्युटीवर असलेल्या पोलिसाने "तुम्हाला आता कोठे जायचे तेथे जा, कोणाकडे तक्रार करायची तेथे करा' अशी वाक्ये ऐकवली. त्यामुळे ज्योतीच्या भावाला रडू कोसळले. 


'सिव्हिल' पुन्हा चर्चेत 
सिव्हिलमधील रुग्णांची हेळसांड, प्रशासनाचा गलथानपणा, निष्काळजीपणा नेहमीच चर्चेत असते. गेल्या आठवड्यात एका रुग्णाच्या नातेवाईकाला पैसे मागण्याचा प्रकार घडला. त्याची क्लिपही व्हायरल झाली. आता निष्काळजीपणामुळे विवाहितेचा मृत्यू ओढवल्याचा आरोप झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच आरोग्यमंत्र्यांनी अचानक पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. 


रुग्णालय निष्काळजीच 
बाळंतीणीचा मृत्यू झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांसह तेथे गेलो. मुलीच्या भावाने कैफियत सांगितली. प्रशासन व पाेलिसांकडेही आम्ही चौकशी केली. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आमच्यासमोर मृत महिलेच्या लहान भावावर दबाव टाकला जात होता. तुझी बहिण परत येणार आहे का? असे म्हणून बळजबरीने गप्प करण्यात आले. नंतर रुग्णालयातच शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
- परेश पुरोहित, शहराध्यक्ष, मनविसे. 


असे इतरांचे होऊ नये 
ज्योतीचा लहान भाऊ अरुण रात्रीपासून रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत होता. सकाळी नातेवाईक आल्यानंतर त्यांनाही हाच अनुभव आला. जसजसा वेळ वाढत गेला, तसे त्याच्यासह नातेवाईकांवर दबाव यायला लागला. अरुणला गप्प राहण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, "माझी बहीण कायमची गेली, इतरांच्या वाट्याला असे मरण येऊ नये, म्हणून रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणा उघडकीस आणायचा आहे' असे तो म्हणत होता. अखेर त्यालाही गप्प करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...