आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकी भरल्यानंतरही वीज तोडल्याने महावितरणवर संताप मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- थकीत बिले घेतल्यानंतर ठरावीक रकमेच्या वसुलीसाठी १३ रोहित्रे बंद करून वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, बंद रोहित्रे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी करत ब्राह्मणीतील शेतकऱ्यांनी मंगळवारी महावितरण कार्यालयावर मोर्चाने जाऊन प्रांगणात ठिय्या आंदोलन केले. 


थकबाकी वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याच्या महावितरणच्या भूमिकेविरूध्द महिन्याभरापूर्वी विविध संघटना, तसेच शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलने छेडण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत शासनाकडून विजेच्या थकबाकीचे हप्ते पाडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले होते. 


शासनाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी वीजबिलाचा पहिला हप्ता भरून प्रतिसाद दिला. मात्र, वसुलीचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी ब्राह्मणी भागातील तब्बल १३ रोहित्रे अचानक बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले. या मनमानीविरूध्द शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली.

 
तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडी सुरू आहेत. अशा परिस्थितीत कुठलीही पूर्वसूचना देता गावातील १३ रोहित्रे बंद करून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वादाला तोंड फोडण्यात आले. विजेचा पुरवठा खंडित करण्यात आल्याने रब्बी पिकांच्या लागवडी खोळंबणार आहेत. शेतातील उभी पिके,जनावरे गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. 


शासनाने दिलेल्या विहित मुदतीत काही शेतकऱ्यांनी बिले भरली आहेत. आर्थिक अडचणीमुळे काही शेतकरी वीजबिले भरू शकले नाहीत. मुदत संपून महिना लोटला. 


दरम्यान, काळात संबंधित विभागाने वीजबील भरलेल्या शेतकऱ्यांना बील भरण्यासाठी दवंडी देत प्रवृत्त करणे अपेक्षित होते. मात्र, महिनाभर मौनी भूमिका घेणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याने अचानक वीज रोहित्र बंद करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. 


या ठिय्या आंदोलनात उपसरपंच डॉ. राजेंद्र बानकर, मोकाटे गुरुजी, रंगनाथ मोकाटे, महेंद्र तांबे, माणिक तारडे, देवीदास ठुबे, अनिल ठुबे, ज्ञानदेव मोकाटे, तोलाजी नवाळे, जालिंदर बानकर, केशव हापसे, धामणे आण्णा, शिवाजी राजदेव, चंद्रभान राजदेव, गोरक्ष शिंदे, उमाकांत हापसे, डॉ. राजदेव, जगन्नाथ वने, माणिक देशमुख, राम राजदेव, अजित तारडे, संभाजी हापसे, एकनाथ वने, चंद्रभान राजदेव आदींसह दोनशे शेतकरी सहभागी झाले होते. महावितरण कार्यालयाकडे जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधला असता अधिकायाने शेतकऱ्यांना अपमानास्पद बोल सुनावले. 


बिल भरून गुन्हा केला का? 
तेरा रोहित्रांवरील बहुतेक वीज ग्राहकांनी विहित मुदतीत वीजबिल भरले आहे. वास्तविक महावितरणे संपूर्ण रोहित्रे बंद करताना प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्यांचा वीजजोड कट करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे होते. त्यामुळे वीजबिल भरून आम्ही गुन्हा केला, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. अचानक दहा रोहित्र बंद केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल करत ठिय्या आंदोलन केले. तत्काळ वीज पुरवठा सुरू केल्यास रास्ता रोकोचो इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 


शेतकऱ्यांना वेठीस धरले 
वीज बिलाचा पहिला हप्ता भरण्यासाठी शासनाकडून ३० नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली होती. या आवाहनानुसार ५० टक्के शेतकऱ्यांनी वीजबिले भरली आहेत. आर्थिक अडचणीमुळे काही शेतकरी बिल भरू शकले नाहीत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्याची गरज होती. मात्र, सरसकट १३ रोहित्रे बंद करून वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासारखा आहे.
- डाॅ.राजेंद्र बानकर, उपसरपंच, ब्राह्मणी, ता. राहुरी. 

बातम्या आणखी आहेत...