आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या पहिल्या महिला रिक्षाचालकाचा मान नीलिमा खरारेंना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहरात सुमारे सर्व प्रकारच्या सहा हजार रिक्षा आहेत. या सर्व पुरुष चालक चालवत आहेत. त्यात आता एका महिलेने रिक्षा चालवण्याचे धाडस केले आहे. नीलिमा मनीष खरारे हे त्यांचे नाव. त्यांनी रिक्षा चालवण्यासाठी घेताना ती इलेक्ट्रिकल (बॅटरीवरची) घेऊन आपला पर्यावरणविषयक दृष्टिकोनही स्पष्ट केला आहे.

 

नगरच्या दिल्लीगेट परिसरात राहणाऱ्या नीलिमा यांचे पती मनीष स्वत: रिक्षा चालवतात. नीलिमा व मनीष यांचा विवाह सन २००४ मध्ये झाला. विवाहानंतरच मनीष यांनी नीलिमा यांना ड्रायव्हिंग शिकवण्यास सुरुवात केली. सन २०१२ मध्ये नीलिमा यांनी नगरच्या एका ड्रायव्हिंग स्कूलमधून रितसर प्रशिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर त्यांना परवानाही मिळाला. त्यानंतर त्यांनी लगेच जुनी व्हॅन खरेदी केली तिचा स्कूल व्हॅनचा अधिकृत परवाना काढून त्यांनी विद्यार्थ्यांची वाहतूकही सुरू केली. २०१३ व २०१४ अशी दोन वर्षे त्यांनी हे काम केले. नगरमध्ये वाहने चालवणाऱ्या अनेक महिला आहेत. पण, विद्यार्थी वाहतूक करणारी पहिली वाहनचालक म्हणून त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले गेले. हा व्यवसाय करताना त्यांच्या असे लक्षात आले, की त्यांना पैसे महिन्याच्या शेवटी मिळत होते. दरम्यान, सर्व गुंतवणूक त्यांना करावी लागत होती. त्यामुळे त्यांनी एका डॉक्टरांकडे त्यांच्या कारच्या चालकाची नोकरी स्वीकारली. त्यांचे कौशल्य पाहून डॉक्टरांनी त्यांना नोकरी दिली. त्या अनेकदा जिल्ह्यातील मोठ्या गावांत डॉक्टरांना घेऊन जातात. शंभर किलोमीटर जाणे व तितकेच किलोमीटर परत त्या ड्रायव्हिंग त्या सहज करतात.

 

दरम्यान, चार वर्षांपासून त्या नगरमधील एका डॉक्टरांकडील कारच्या चालक म्हणून काम करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी नगर शहरात ई-रिक्षा लाँच झाली. त्यांनी लगेच ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकतर यामागे पर्यावरणाचा दृष्टिकोन होता. शिवाय ती आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर आहे. शिवाय नीलिमा यांच्याकडे फक्त अडीच तासच मोकळे असतात. कारण सकाळी आठ ते दुपारी दीड व सायंकाळी पाच ते साडेसहा अशी, त्यांची नोकरीची वेळ आहे. त्यामुळे दीड ते पाच या दरम्यानचा वेळ त्यांच्याकडे शिल्लक असतो. त्या वेळेत त्या ई-रिक्षा चालवतात. ही रिक्षा चालवण्यासाठी सध्या कोणत्याही परवान्याची गरज नाही. पण भविष्यात ती चालवण्यासाठी खास परवाना घ्यावा लागणार आहे. आवश्यक तो परवाना देण्याचे उपप्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी त्यांना आश्वासन दिल्याचे त्या आवर्जून सांगतात. सध्या त्यांची रिक्षा महिला प्रवासी जास्त पसंत करतात. एका महिला चालकाचा त्यांना आधार वाटतो. आपल्या सर्व व्यावसायिक कौशल्याचे श्रेय त्या पतींना देतात. कारण त्यांनीच त्यांना प्रशिक्षित करण्याबरोबर प्रोत्साहनही दिले असल्याचे त्या नमूद करतात. मोठ्या शहरांत महिलांनी रिक्षा चालवणे, ही बाब नवीन नसली, तरी नीलिमा यांनी नगर शहरातील महिलांसमोर या नवीन क्षेत्रातून सन्मानाने अर्थार्जन करता येते, याचे उदाहरण ठेवले आहे.


मुलांना उच्च शिक्षित करण्याची जिद्द
अल्प म्हणजे फक्त आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या नीलिमांची जिद्द आपल्या आठवी व तिसरीत असलेल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची आहे. त्यासाठी त्या पती मनीष यांच्या बरोबरीने कष्ट उपसत आहेत. मुलाला त्यांनी भाळवणीच्या निवासी शाळेत शिक्षणासाठी ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...