आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारणासाठी चार शेतकऱ्यांनी दिली आपली अर्ध्या एकराहून अधिक जमीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- पाणी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गोयकरवाडी येथे जलसंधारणाचे मोठे काम झाले. ओढा खोलीकरणासाठी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रत्येकी अर्धा एकरापेक्षाही अधिक जमीन देऊन या चळवळीत नोंदवलेला सहभाग राज्यात वाखणण्याजोगा ठरला आहे.

 
तालुक्यातील विविध गावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाचे काम सुरू आहे. सहा गावांना राज्य सरकारतर्फे डिझेलसाठी प्रोत्साहनपर दीड लाखांचे अनुदान देण्यात आले. खोलीकरणासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे पोकलेन देण्यात आले. या संधीचा सर्वाधिक फायदा गोयकरवाडीने उठवला. आठशे मीटर लांबीचे ओढा खोलीकरणाचे काम आतापर्यंत करण्यात आले. रूंदी ३० फूट, तर खोली दहा फूट करण्यात आली. त्यामुळे ५० दशलक्ष घनफूट पेक्षाही अधिक पाणीसाठा होणार आहे. 


हा परिसर जलसंधारणाचे काम करण्यास अनुकूल आहे. तिन्ही बाजूने माळरान व पायथ्याला काळी जमीन. मधोमध वाहणारा ओढा. हा ओढा गेल्या पंचवीस वर्षांपासून अस्तित्वात राहिला नव्हता. शेतकऱ्यांनी ओढा बुजवून सुपीक जमीन तयार केली होती. याचा परिणाम या भागातील पाणीपातळीवरही झाला होता. आज इतर ठिकाणी पाण्याची परिस्थिती बरी असताना गोयकरवाडीला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत पाणी फाउंडेशनच्या वतीने गोयकरवाडीत वेळोवेळी झालेले मार्गदर्शन व राळेगणसिध्दी येथील प्रशिक्षण याचा परिणाम गोयकरवाडीत परिवर्तन घडले. 


बांधावरून होणारी भांडणे, रस्ता किंवा अन्य बाबींसाठी एक फूटही जादा जमीन न देणाऱ्या शेतकऱ्यांनी गोयकरवाडीत तब्बल सत्तर फूट रूंदीची सुपीक जमीन दिली. विशेष म्हणजे भाऊसाहेब बंडगर व विलास बंडगर या दोघा भावांचा नव्यानेच लागवड केलेला तब्बल चार फूट वाढलेला ऊस होता. त्याठिकाणी खोलीकरण कसे करायचे हा प्रश्र होता. मात्र, खोलीकरण कामात उसाचा अडथळा नको, म्हणून बंडगर बंधुंनी उभा ऊस तोडून खोलीकरणासाठी लागणाऱ्या अर्धा एकरपेक्षा अधिक जमीन मोकळी करून दिली. 


रंगनाथ ठोंबरे, दत्तात्रय सूळ, बापूराव बरकडे व आसराबाई गणपत सूळ यांनी त्याच्या शेतातील प्रत्येकी अर्धा एकरपेक्षा अधिक जमीन खोलीकरणासाठी दिली. पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक संतोष दहिफळे, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वक राजेंद्र धनवे यांनी यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तहसीलदार विजय भंडारी, मंडळ अधिकारी पाचारणे, उद्योजक व जैन संघटनेचे कार्यकर्ते दिलीप गुगळे, जैन फाउंडेशनचे तालुकाप्रमुख व समन्वयक प्रवीण चोरडीया यांनीही गोयकरवाडी येथे येऊन लोकांना प्रोत्साहन दिले. खोलीकरण कामासाठी तातडीने टुटेन क्षमतेचे मोठे पोकलेन मिळवून देण्यासाठी तालूका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, मंडळ कृषी अधिकारी सुंदरदास बिरंगळ, उद्योजक मंगेश आजबे यांनी ग्रामस्थांना मदत केली. ओढा खोलीकरण कामासाठी जमीन दिलेल्या आसराबाई सूळ, सिंधुताई बंडगर, रंगनाथ ठोंबरे, दत्तात्रय सूळ, बापुराव बरकडे या शेतकऱ्यांचा पालकमंत्री राम शिंदे यांनी सन्मान केला. 


भविष्याचाच विचार केला 
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राळेगणसिध्दीला प्रशिक्षण घेतले. त्यावेळी पाण्याचे महत्त्व पटले. आपल्या गावातही असेच काम करण्याचा निश्चिय केला. माझ्या जमिनीवर ऊस होता. परंतु भाऊसाहेब आणि विलास या दोन्ही मुलांना सांगून ऊस तोडून खोलीकरण केले. जमीन पिकवायची असेल, तर पाण्याशिवाय शक्य नाही. खोलीकरणामुळे माझ्या जमिनीतच पाणी राहणार आहे. हे काम करताना मी भविष्याचाच विचार केला.
- सिंधुताई भानुदास बंडगर, बंडगर बंधुंची आई. 

बातम्या आणखी आहेत...