आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर हवे; कृती समितीच्या माध्यमातून जनआंदोलनाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा चर्चेत आणल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यासंदर्भात सूतोवाच केले. त्यामुळे जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संगमनेर हा नवा जिल्हा केला जावा, यासाठी कृती समितीच्या माध्यमातून संगमनेरकर एकवटले आहेत. पुन्हा एकदा जनआंदोलन उभारण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 


तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळापासून नगर जिल्हा विभाजनाचे घोंगडे भिजत पडले आहे. राजकीय नेत्यांनी वारंवार जिल्हा विभाजनाचा मुद्दा चर्चेत आणत आपली राजकीय पोळी भाजली. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर नव्या भाजप सरकारच्या पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आणला. जिल्हा विभाजनासाठी सरकारसह सर्वच आग्रही अाहेत. मात्र, जिल्हा मुख्यालयाबाबत एकमत होत नसल्याने हा कळीचा मुद्दा ठरला आहे. श्रीरामपूर, कोपरगाव आणि शिर्डीकर जिल्हा मुख्यालयावर हक्क सांगत असल्याने राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता असताना अाता नव्या जिल्ह्यासाठी संगमनेरकरांनी आपली वज्रमूठ आवळली आहे. अन्य दावेदारांच्या तुलनेत कोणत्याही स्थितीत जिल्हा मुख्यालयासाठी संगमनेरच योग्य असल्याने यासाठी जनआंदोलन उभारले जाणार आहे. 


नव्या जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेरच असावे, यासाठी 'संगमनेर जिल्हा कृती समिती' सक्रीय झाली आहे. रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा विभाजनाच्या अनुषंगाने रुपरेषा ठरवण्यात आली असून तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना नव्याने मंगळवारी (६ फेब्रुवारी) निवेदन देण्यात येईल. जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन संगमनेरच सर्वंकषदृष्ट्या जिल्ह्यासाठी कसे योग्य आहे याचे महत्त्व त्यांना पटवून देण्यात येणार आहे. यापूर्वीच शासनाकडे संगमनेरसह शिर्डी, श्रीरामपूरचा अहवाल गेलेला असल्याने जनआंदोलनाच्या माध्यमातून याला आणखी बळकटी आणली जाईल. 


जनआंदोलनाचा एल्गार देण्यासाठी झालेल्या बैठकीसाठी भाजप नेते राजेश चौधरी, तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कतारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, शहराध्यक्ष प्रशांत वामन, यांच्यासह नरेश माळवे, राजाभाऊ देशमुख, शरद थोरात, अमोल खताळ, किशोर कालडा, शौकत जहागीरदार, शैलेश कलंत्री, सचिन पलोड, दीपक साळुंके, किरण घोटेकर, अॅड. विशाल जाधव, अॅड. संग्राम जोंधळे, लक्ष्मीकांत दसरे, दीपक भगत आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 


नवा अल्बम तयार करणार 
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते राजेश चौधरी यांच्या माध्यमातून जिल्हा विभाजनासंदर्भात संगमनेरात उपलब्ध असलेल्या आवश्यक बाबी, इमारती, कार्यालये, पूरक गोष्टी आदींसदर्भातील माहितीचा अल्बम तयार करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख मंत्री, अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्यात आणखी गोष्टींची भर घालून पुन्हा नव्याने हा अल्बम तयार केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...