आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाची आेढ असलेल्या करणच्या मदतीसाठी सरसावले हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- आई मूकबधिर आणि वडील आजारी. घरात अठराविश्व दारिद्र्य. शिक्षणाची ओढ असलेल्या करणवर शैक्षणिक साहित्याकरिता पैसे जमवण्यासाठी दारोदार भीक मागण्याची वेळ आली होती. करण सुदाम चव्हाण याची ही परिस्थिती समजल्यानंतर त्याच्या दोन वर्षांच्या शिक्षणाची जबाबदारी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी घेतली. 


परिस्थितीतून मार्ग काढून खूप शिकून मोठे व्हायचे करणचे स्वप्न आहे. त्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची मनाची तयारी त्याने केली. १५ जूनपासून सुरु होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात इयत्ता ९ वीच्या वर्गासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य विकत घेता यावे, यासाठी करण मागील चार दिवसांपासून गावाेगाव फिरून अक्षरशः भीक मागत होता. आठवडा बाजाराच्या दिवशी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन मला शिक्षण घेण्यासाठी वह्या, पुस्तके घेण्यासाठी १, २ रूपये द्या, अशी विनवणी तो दुकानदारांकडे करत होता. 


व्यापारी रामचंद्र जायभाय यांच्या दुकानात करण गेल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संवाद साधला. करणने आपली हृदयद्रावक कहाणी त्यांना सांगितली. महेश बेदरे यांनी ही बाब संजय कोठारी यांना सांगितली. त्यांनी करणच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून दोन वर्षांसाठी त्याची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे सांगितले. लगेचच सर्व आवश्यक शैक्षणिक व दोन गणवेश कोठारी यांनी त्याला घेऊन दिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमोल ताथेड, महेश बेदरे यांच्यासह करणची आई व आजी उपस्थित होत्या. 


सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे करणची शैक्षणिक जबाबदारी घेत असल्याचे कळताच त्याची आई व आजीला अश्रू अनावर झाले. ही बाब जगासमोर आणणाऱ्या महेश बेदरे यांना त्यांनी मनोमन धन्यवाद दिले. 


पुढेही सर्वतोपरी मदत करणार 
करणची दोन वर्षांची शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. पुढेही आम्ही त्याला सर्वतोपरी मदत करु. आता त्याला कुठेही भीक मागण्याची गरज पडणार नाही.
- संजय कोठारी, सामाजिक कार्यकर्ते.

बातम्या आणखी आहेत...