आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर- राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपींना अटक करूनही त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळालेले नाहीत. त्यात मुख्य आरोपी संदीप गुंजाळ व इतर आरोपींच्या जबाबांमध्ये अजूनही विसंगती आहे. त्यामुळे आरोपींची नार्काे चाचणी करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. भर वस्तीत दिवसाढवळ्या दोन जणांची गोळ्या घालून व तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र, पंधरा दिवस उलटूनही अद्याप एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा समोर आलेला नाही. दरम्यान, पोलिस प्रशासनाने माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तरी प्रत्यक्षदर्शिंनी समोर न येणेच पसंत केले. त्यामुळे आरोपी पकडूनही पोलिस हतबल असल्याचेच सध्याचे चित्र आहे.
पंधरा दिवसांपूर्वी (७ एप्रिल) केडगाव उपनगरातील सुवर्णनगर परिसरात सायंकाळी ६ च्या सुमारास गोळीबार झाला. गोळीबारात शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे जागीच ठार झाले. या हत्याकांडानंतर पोलिसांवर दगडफेक, पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड, पोलिस कोठडीत असलेले नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू अशा अनेक घटना घडल्या. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली. त्यात मुख्य आरोपी गुंजाळ याने स्वत: पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळे, रवी खोल्लम, बाबासाहेब केदार या आरोपींना देखील अटक करण्यात आली. मात्र, गुंजाळ व इतर आरोपींच्या जबाबांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. आरोपींना अटक केली असली, तरी त्यांच्या विरोधात अद्याप सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शिंनी माहिती द्यावी, असे वारंवार आवाहन केले. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल, शिवाय त्याला एक लाख रुपयांचे राेख बक्षीसही देण्यात येईल, असे आवाहन करूनही एकही प्रत्यक्षदर्शी माहिती देण्यास पुढे आलेला नाही. त्यामुळे गुन्ह्याचा तपास प्रगतिपथावर असल्याचे सांगणारे पोलिस आता हतबल झाल्याचे दिसत आहेत. आरोपींची नार्काे चाचणी करण्याचा निर्णय देखील पोलिस प्रशासनाने घेतला अाहे. नार्काे चाचणीनंतर खरा घटनाक्रम व इतर बाबी समोर येतील, असा विश्वास पोलिसांना आहे. परंतु आरोपी गुंजाळ वगळता इतर आरोपी आपल्या जबाबावर ठाम आहेत. गुन्हा घडल्यानंतर तेथे पोहोचलो, प्रत्येक्ष गुन्ह्याशी आमचा काहीच संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोठडीत पोलिसांचा मार खाऊनही त्यांनी आपला जबाब बदललेला नाही. त्यामुळे पोलिसांना एक, तरी प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळणे आवश्यक आहे, परंतु प्रत्यक्षदर्शी पुढे येण्यास कोणी तयार नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत.
असे आहे आरोपींचे म्हणणे...
संदीप गुंजाळ : दोघांचीही हत्या मी एकट्यानेच केली (सुरुवातीचा जबाब), ठुबे यांना गिऱ्हे याने, तर कोतकर यांना मी स्वत: मारले.
संदीप गिऱ्हे : हत्येशी काहीच संबंध नाही, घटना घडल्यानंतर तेथे पोहोचलो. त्याच परिसरात राहण्यास आहे, म्हणून तेथे गेलो.
पप्पू मोकळे : हत्येशी काहीच संबंध नाही, घटना घडली तेव्हा तेथे पोहोचलो, हत्येबाबत काहीच माहिती नाही.
रवी खोल्लम : कोतकर यांनी मला मारण्याची धमकी दिली, माझ्या बचावासाठी गुंजाळ तेथे आला, मी घरी नव्हतो.
खोल्लममुळेच घडले हत्याकांड!
मृत संजय कोतकर व आरोपी खोल्लम यांचे फोनवर भांडण झाले, कोतकर व वसंत ठुबे हे आपल्याला मारण्यासाठी येत असल्याची माहिती खोल्लम याने नवनिर्वाचित विजयी नगरसेवक विशाल कोतकर याला दिली. त्यानंतर खोल्लम याच्या बचावासाठी गुंजाळ, गिऱ्हे, मोकळे हे खोल्लमच्या घरी पोहोचले. त्यानंतर काही वेळातच हे दुहेरी हत्याकांड घडले. मात्र, हत्याकांडात खोल्लम, गिऱ्हे व मोकळे यांचा प्रत्यक्ष सहभाग होता का, हे अद्याप पोलिस तपासात स्पष्ट झालेले नाही. खोल्लम याच्यामुळेच हे हत्याकांड घडल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.
कर्डिलेंच्या जामिनावर उद्या सुनावणी
पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे. अॅड. महेश तवले यांच्यामार्फत हा अर्ज दाखल केला अाहे. कर्डिलेंसह इतर चार जणांना जामीन मागितला आहे. दरम्यान, केडगाव हत्याकांडाच्या फिर्यादीतही कर्डिलेंचे नाव आहे. त्यांना या गुन्ह्यात वर्ग करण्याबाबत पोलिसांनी हलचाली केल्या नाहीत. त्याचे पुरावेही नाहीत. त्यामुळेच कर्डिले यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी (२३ एप्रिल) सुनावणी होणार आहे.
गुंजाळची न्यायालयीन कोठडीत रवानगी
हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याची १४ दिवसांची पोलिस कोठडी पूर्ण झाली. या चौदा दिवसांत त्याने वेगवेगळे जबाब देत पोलिसांची दिशाभूल केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गुंजाळ याच्यासह गिऱ्हे, मोकळे व केदार यांना शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश एस. एस. पाटील यांनी गुंजाळ व केदार यांना न्यायालयीन कोठडी सुनावली, तर गिऱ्हे व मोकळे यांच्या कोठडीत २५ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. गंुजाळ व केदार यांना न्यायालयीन कोठडी देण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.