आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी रवी खोल्लममुळेच घडले केडगाव दुुहेरी हत्याकांड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांड ज्याच्यामुळे घडले, तो फरार आरोपी रवी खोल्लम याला पोलिसांनी गुरुवारी पहाटे आळेफाटा येथे अटक केली. न्यायाधीश एस. एस. पाटील यांच्यासमोर हजर केले असता त्याला सहा दिवसांची (२४ एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. खोल्लम याच्यामुळेच हे हत्याकांड घडले असून त्याला जास्तीत जास्त दिवस पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद तपासी अधिकारी दिलीप पवार व सरकारी वकील सीमा देशपांडे यांनी केला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्यासह संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळे व बाबासाहेब केदार यांच्या पोलिस कोठडीतही तीन दिवसांची (२१ एप्रिलपर्यंत) वाढ करण्यात आली.

 

केडगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक ३२ ब च्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला, त्या दिवशी (७ एप्रिल) दुपारी मृत संजय कोतकर व आरोपी खोल्लम यांचे फोनवर भांडण झाले होते. याबाबत कोतकर व वसंत ठुबे हे आपल्याला मारण्यासाठी येत असल्याची माहिती खोल्लम याने विजयी उमेदवार विशाल कोतकर याला दिली. त्यानंतर खोल्लम याच्या बचावासाठी गुंजाळ, गिऱ्हे, मोकळे हे खोल्लमच्या घरी पोहोचले. त्यानंतर काही वेळातच हे दुहेरी हत्याकांड घडले, या सर्व हत्याकांडाला खोल्लम हाच जबाबदार अाहे, असा युक्तिवाद तपासी अधिकारी पवार व सरकारी वकील देशपांडे यांनी न्यायाधीश पाटील यांच्यासमोर केला. आरोपीच्या वकिलाने मात्र या घटनेशी खोल्लमचा काहीच संबंध नसल्याचे सांगितले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खोल्लम याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपी गुंजाळ, गिऱ्हे, मोकळे व केदार यांच्या वकिलांनीदेखील न्यायालयीन कोठडीसाठी युक्तिवाद केला. १२ दिवसांची पाेलिस कोठडी घेऊनही पोलिसांना तपासात काही निष्पन्न करता आले नाही. घटना घडली तेथे उपस्थित होतो, परंतु घटनेशी काही संबंध नसल्याचे पोलिसांना अनेकदा सांगितले असल्याचेही आरोपींच्या वकिलांनी सांगितले. मात्र, सरकारी पक्षाच्या वतीने केलेल्या युक्तिवादाच्या आधारे चौघांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली. गुन्ह्याची कबुली देणारा मुख्य आरोपी गुंजाळ, तसेच ज्याच्यामुळे हे हत्याकांड घडले तो खोल्लम व गुन्ह्यात सहभागी असलेले इतर आरोपी अटकेत असल्याने हत्याकांडाच्या तपासाला गती मिळणार आहे. 


कोण आहे खोल्लम? 
आरोपी खोल्लम हा सुवर्णनगर परिसरात राहतो. त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून तो विशाल कोतकरचा कार्यकर्ता आहे. पोटनिवडणुकीत खोल्लम याने कोतकरचा प्रचार केला. प्रचारातील अनेक जबाबदाऱ्याही त्याने सांभाळल्या. आरोपी गिऱ्हे हाही याच परिसरात रहात असून त्याचे खोल्लमशी मैत्रीचे संबंध आहेत. आरोपी मोकळेचे घरही खोल्लमच्या घराजवळ आहे. 

 

खोल्लमच्या फोननंतर ठरला 'गेम' 
रवी खोल्लम व मृत संजय कोतकर यांच्यात फोनवर भांडण झाले, तुझ्याकडे बघतो, तू घरीच थांब, अशी धमकी कोतकर यांनी खोल्लमला िदली. खोल्लम याने झाला प्रकार विशाल कोतकर याला फोनवरून सांगितला. त्यानंतरच कोतकर व वसंत ठुबे यांचा 'गेम' करण्याचे िनश्चित झाले. मात्र, हा कट कुठे, कोणी व कधी रचला याबाबतचा तपास लागलेला नाही. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील सीमा देशपांडे यांनी केला.

 
कागदपत्रे मागवली 
कोतकर व ठुबे यांची जेथे हत्या झाली, तेथे आरोपींनी वापरलेली दुचाकी मिळून आली होती. ही दुचाकी कोणाच्या मालकीची आहे, याचा तपास पोलिस घेत आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दुचाकीच्या कागदपत्रांची माहिती मागवली आहे. आरोपी गिऱ्हे याचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा घडण्यापूर्वी, तसेच गुन्हा घडल्यानंतर त्याचे कोणाशी संभाषण झाले, याचा तपास सुरू असल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...