आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड: जामीन घेण्यास आमदार संग्राम जगताप यांचा नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जामीन घेण्यास नकार दिला. त्यांचे वकील महेश तवले यांनी जगताप यांचा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने या अर्जावर सरकारी वकिलांचे म्हणणे मागितले होते. दरम्यान, जगताप यांनीच जामीन घेण्यास नकार दिल्याने न्यायालयात दाखल अर्ज मागे घेतला असल्याची माहिती अॅड. तवले यांनी दिली. 


शिवसेनेचे केडगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आमदार जगताप यांना घटनेच्या दिवशीच (७ एप्रिल) रात्री ११ च्या सुमारास अटक करण्यात आली. मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्रामने दिलेल्या फिर्यादीत जगताप यांचे नाव असून त्यांच्या विरोधात हत्येचा कट रचण्यात सहभागी असल्याप्रकरणी कलम १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चार दिवसांची पोलिस कोठडी राखून ठेवत त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयाकडे केला होता. त्यानुसार जगताप यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कटात सहभागी असल्याबाबत जगताप यांच्याविरोधात अद्याप कोणताच ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर होईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे. त्यांचे वकील महेश तवले यांनी बुधवारी जामिनासाठी न्यायालयासमोर अर्जही सादर केला. या अर्जावर सरकारी वकिलांनी म्हणणे सादर करावे, असे सांगत न्यायालयाने जामीन अर्ज राखून ठेवला. दरम्यान, त्यांचा हा अर्ज तवले यांनी गुरूवारी मागे घेतला. आमदार जगताप यांनीच जामीन घेण्यास नकार दिला असून त्यांच्या सूचनेनुसारच हा अर्ज मागे घेण्यात आला असल्याची माहिती तवले यांनी दिली. विरोधकांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवले असून गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत जामीन घेणार नसल्याची भूमिका जगताप यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेने खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना मोठी चपराक बसणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. 
न्यायालयात दाखल अर्ज मागे घेण्यास सांगितले 


जगताप यांचा गुन्ह्याशी संबंध नाही 
पोलिसांना केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास पूर्ण करून ९० दिवसांच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल करावे लागणार आहे. आमदार जगताप यांच्याविरोधात अद्याप कोणतेच पुरावे मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे गुन्ह्यातील मुख्य आरोपींनादेखील अटक करण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणाशी जगताप यांचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमदार जगताप यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु जगताप यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...