आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपरगावला निळवंड्यातून पिण्याचे पाणी देणारच; हरिभाऊ बागडे यांची नि:संदिग्ध ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोेपरगाव- पाणी ही राष्ट्राची संपत्ती आहे. निळवंडे धरणातील पाण्यावरही सर्वांचा हक्क आहे. याच भूमिकेतून कोपरगाव शहराला निळवंड्यातून पिण्याचे पाणी शासन देणार आहे. तुम्ही काळजी करू नका, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. 


संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी संजीवनी ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूट कार्यस्थळावर बागडे यांच्या हस्ते आपत्ती निवारण पथकाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे होते. आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी फाउंडेशनचे सुमित कोल्हे, कार्यकारी संचालक जिवाजीराव मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी सभापती मच्छिंद्र टेके यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर रमेशगिरी महाराज, दत्तात्रय कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, शिर्डीच्या नगराध्यक्ष योगिता शेळके, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, संजय सातभाई, दिलीप दारूणकर, उत्तर नगर जिल्हा सेनेचे कैलास जाधव, गटनेते योगेश बागूल, रवींद्र पाठक, कैलास खैरे, सर्व आजी-माजी नगरसेवक, संजीवनी कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी प्रशासकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आपत्ती निवारण पथकाबाबत माहिती दिली. 


बिपीन कोल्हे हे वाढदिवशी शाल, हार, गुच्छ न स्वीकारता शालेय साहित्य व रोपांचे वाटप करतात. दहा वर्षांत त्यांचा हा संकल्प दहा लाखांच्या घरात गेला. या वेळी बागडे यांच्या हस्ते पाच शाळांतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या व रोपांचे वाटप करण्यात आले. कोल्हे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 


बागडे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे सहकार व पाण्याचे अभ्यासक असून मतदारसंघासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. १९६६ पासून त्यांचा व माझा संबंध आहे. ग्रामीण भागातील युवक देश-विदेशांत पुढे गेले पाहिजेत, यासाठी त्यांनी जी शैक्षणिक चळवळ उभी केली, ती अतुलनीय आहे. आज वडिलोपार्जित जमिनीचे तुकडे होत गेल्याने दर्जेदार शिक्षण हाच एकमेव पर्याय असल्याने कोल्हे यांनी काळाची पावले ओळखून ही चळवळ पुढे सुरू ठेवली. विविध आपत्तीजन्य परिस्थिती कोल्हे कुटुंबीय सर्वांना बरोबर घेऊन मदत करतात. कार्यकर्ता बनवणे व तो टिकवणे ही कला या कुटुंबाला अवगत आहे. 


सत्काराला उत्तर देताना बिपीन कोल्हे म्हणाले, वाढदिवशी लोकोपयोगी उपक्रम राबवून समाजाला स्वतःच्या कृतीतून सामाजिक संदेश देणारे उपक्रम कार्यकर्ते व कोल्हे कुटुंबीय घेतात. कामे आम्ही खूप करतो, पण त्याची जाहिरातबाजी करण्यात कमी पडतो. ब्रिटिश काळापासून कोपरगाव तालुका अवर्षणग्रस्त असून बारमाही गोदावरी कालव्यांची निर्मिती करून पाटपाणी दिले. मात्र, कायमस्वरूपी पाणी कसे मिळेल यावर युती शासनाने भर द्यावा. निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करून अध्यादेश काढला. मात्र, विघ्नसंतोषी शुक्राचार्य त्यात अडथळा आणत आहेत. त्यांना सुबुध्दी देवो व कोपरगावला पिण्याचे पाणी मिळो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 


भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. कोल्हे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. पाचशे कंपास कार्यकर्त्यांनी कोल्हे यांना भेट दिल्या. 


संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते त्यांचा गुरूवारी कोपरगाव येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला. 


शेतकऱ्यांवर अन्याय नाही... 
आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणूनच माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी पक्ष बदलला. २०१४ च्या निवडणुकीत आपल्याला पक्ष नवा होता, तरीही कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिल्यामुळे लोकप्रतिनिधीपदी मला संधी मिळाली. निळवंडे कालवेप्रश्नी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न देता राखीव पाण्यातूनच शिर्डी व कोपरगावला पिण्याचे पाणी घेत आहोत. मात्र, याबाबत काही जणांनी वावड्या उठवून विरोध केला. युती शासनाच्या माध्यमातून दहा वर्षांचा विकासाचा बॅकलाॅग आपण भरून काढला आहे. 

बातम्या आणखी आहेत...