आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी तर गुंजाळला भांडण मिटवायला पाठवले होते; मुख्य सूत्रधार विशाल कोतकरचा पोलिसांसमोर जबाब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केडगाव हत्याकांडातील मुख्य सूत्रधार विशाल कोतकर याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. - Divya Marathi
केडगाव हत्याकांडातील मुख्य सूत्रधार विशाल कोतकर याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार विशाल कोतकर याला मंगळवारी पहाटे ४ वाजता अटक करण्यात आली. संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी मी संदीप गुंजाळ याला पाठवले होते. गुंजाळ हा कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करेल, असे वाटलेही नव्हते, असा जबाब विशालने पोलिसांसमोर दिला आहे. दरम्यान, कट रचून हे हत्याकांड केल्याबाबत अद्याप कोणताच पुरावा मिळालेला नाही, तरी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व भानुदास कोतकर यांच्याकडे पोलिसांची संशयाची सुई फिरली आहे. विशाल कोतकर याला न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


केडगाव दुहेरी हत्याकांडातील तपास आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. सर्व प्रमुख अारोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचे कारणही स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक ३२ ब मधील पोटनिवडणुकीच्या वादातूनच हे हत्याकांड घडले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोटनिवडणूक ६ एप्रिलला पार पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता निकालही जाहीर झाला. काँग्रेसचा उमेदवार तथा हत्याकांडातील आरोपी विशाल कोतकर निवडून आला. मात्र, शिवसेनेचे केडगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांना आपला उमेदवार पडल्याचे दु:ख झाले. रवी खोल्लम याच्यामुळेच आपला उमेदवार पडला असल्याची खात्री दोघांना झाली. त्यामुळे संजय कोतकर यांनी रवी खोल्लम याला घटनेच्या दिवशी (७ एप्रिल) फोनवरून धमकी दिली. तू घरी थांब, तुझ्याकडे पाहतो, असे म्हणत शिवीगाळ केली. खोल्लम याने हे संभाषण रेकॉर्ड करून ते विशाल काेतकर व सुवर्णा कोतकर यांना ऐकवले. यावेळी विशाल कोतकर यांच्या घरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल कोतकर याने खोल्लम व संजय कोतकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी संदीप गुंजाळला फोन केला. जाऊन तेवढे भांडण मिटव, असे कोतकरने गंुजाळला सांगितले. गुंजाळ दोघांची हत्या करेल, असे वाटलेदेखील नव्हते, असा जबाब विशालने पोलिसांना दिला आहे. न्यायालयाने विशालला २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी रवी खोल्लम याच्या पोलिस कोठडीत देखील २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. 


हत्याकांड प्रकरणी ८० जणांची चौकशी 
आरोपी गुंजाळ याने स्वत:हून हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. तरीदेखील या दुहेरी हत्याकांडाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. आरोपी, तसेच फिर्यादीत नावे असलेल्यांच्या संपर्कात कोण होते, त्यांचे फोनवरून झालेले संभाष, त्यांचे लोकेशन आदी बाबी पोलिसांनी पडताळून पाहिल्या. त्यातून तब्बल ८० जणांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या या धरपकडीमुळे अनेकांचे धाबे दणाणले. त्यांचा हा तपास अजूनही सुरूच आहे. आरोपींसह त्यांच्या संपर्कातील सर्वांचे कॉल रेकॉर्डिंग पोलिस तपासून पहात आहेत. 
मागील १५ दिवसांपासून शहरात व जिल्ह्यात सध्या याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. 


गिऱ्हे व मोकळे जबाबावर ठाम 
संजय कोतकर यांना मी स्वत:, तर वसंत ठुबे यांना संदीप गिऱ्हे याने मारल्याची कबुली आरोपी संदीप गंुजाळ याने पोलिसांसमोर दिली. गुन्ह्याचा घटनाक्रमही त्याने सांगितला. मात्र, या हत्याकांडाशी आपला काहीच संबंध नसल्याचा जबाब गिऱ्हे व आरोपी पप्पू मोकळे यांनी पोलिसांना दिला आहे. आम्ही केवळ घटनास्थळी होतो. हत्येशी आमचा संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या विसंगत जबाबांमुळे पोलिसांसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिस कोठडीत कसून चौकशी करूनही गिऱ्हे व मोकळे आपल्या जबाबावर ठाम आहेत. 


कोतकर कुटुंबाकडे संशयाची सुई 
संजय कोतकर यांनी फोनवरून धमकी दिल्याचे संभाषण आरोपी खोल्लम याने विशाल व सुवर्णा कोतकर यांना ऐकवले. त्यानंतर सुवर्णा कोतकर यांचे सासरे भानुदास कोतकर याच्याशी फोनवरून बोलणे झाले असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मात्र, हे बोलणे कौटुंबिक होते, की त्याचा या हत्याकांडाशी काही संबंध होता, याबाबत पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे हत्याकांडप्रकरणी पोलिसांची संशयाची सुई सुवर्णा व भानुदास कोतकर यांच्याकडे फिरली आहे. भानुदास कोतकर हा अशोक लांडे खूनप्रकरणातील आरोपी असून सध्या जामिनावर आहे. 


विशालने केले देवदर्शन 
हत्याकांडातील मुख्य सूत्रधार विशाल कोतकर फरार होता. पोलिस आपल्या मागावर असल्याचे माहिती असूनही विशालने अनेक देवदर्शन केले. गाणगापूर, तुळजापूर, मोहटादेवी, हैदराबाद आदी ठिकाणी विशाल फिरला. त्यानंतर स्वत:हून हजर होण्यासाठी तो गेल्या तीन- चार दिवसांपासून पोलिसांच्या संपर्कात होता. आज हजर होतो, उद्या हजर होतो, असे तो करत होता. पोलिसांनी विशालला मंगळवारी पहाटे कामरगाव शिवारातील हॉटेल सुवर्णज्योत येथे अटक केली. न्यायाधीश एस. एस. पाटील यांनी त्याला ४ दिवसांची कोठडी सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...