आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष डांभे भाजपत जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा वापर फक्त निवडणुकीपुरता करून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे हाच कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसकडून राबवला जातो. माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व अॅड. प्रताप ढाकणे यांच्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आपणही पक्षाचा त्याग करत आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मनीषा डांभे यांनी शुक्रवारी दिली. 


गेल्या काही दिवसांपासून घुले-ढाकणे या दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू अाहे. घुले यांनी पाथर्डी तालुका जवळजवळ वर्ज्य केला आहे. अॅड.प्रताप ढाकणे यांच्या मित्रमंडळातर्फे सार्वजनिक कार्यक्रम वाढले आहेत. वॉटर कप स्पर्धा, जिल्हा परिषद भालगाव गटातील विकासकामे आदींच्या माध्यमातून ढाकणे यांनी निवडणुकीसाठी बांधणी चालवली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदरमोड करून कामे करावी लागतात. त्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी कार्यकर्त्यांना नेत्यांकडून अपशब्द वापरून अपमानित केले जाते, असा आरोप डांभे यांनी केला. 


डांभे म्हणाल्या, सत्ता नसताना कार्यकर्ते सांभाळून त्यांना सक्रिय ठेवणे हे मोठे कष्टाचे काम असते. स्थानिक नेत्यांकडून साधन, सुविधा पुरवल्या जात नाहीत. कार्यकारिणी निवडताना विश्वासात घेतले जात नाही. कोणाला नियुक्तीपत्र द्यायचे आहे, याची जरासुद्धा कल्पना नसते. मोठ्या नेत्यांकडे चर्चेसाठी जाताना बगलबच्च्यांना नेले जाते. बैठकीत काय घडले याची कल्पनाही दिली जात नाही. गटबाजीला कंटाळून तालुक्यातील अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असून आमदार मोनिका राजळे यांच्या संपर्कात आहेत. लवकरच अनेक कार्यकर्ते समारंभपूर्वक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले. 


नेत्यांच्या पक्षनिष्ठा व वेळोवेळी होणाऱ्या राजकीय तडजोडी संशयास्पद ठरून कार्यकर्ते व नेत्यांमध्ये विसंवाद वाढत आहे. आगामी निवडणुकीमध्ये नेत्यांना तालुक्यात कार्यकर्ते शोधत फिरण्याची वेळ येणार आहे. अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करून लोकांच्या नाराजीला सामोरे जाण्यापेक्षा विकासकामे करत कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा भाजपच्या माध्यमातून आगामी काळात आपण सक्रिय राहू, असे सांगून डांभे म्हणाल्या, तालुक्यात भाजपला चांगले भवितव्य आहे. ढवळेवाडी ग्रामपंचायती निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची करून भाजप पुरस्कृत आघाडी आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आणून त्यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करू. आपला अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे, असेही डांभे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...