आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिशन ऑल आऊट'ला यश; ३० दिवसांत २५६ आरोपी तुरूंगात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर -  'मिशन ऑल आऊट'अंतर्गत ३० दिवसांत २५६ अारोपींना अटक करत १५ पिस्तुले, २३ जिवंत काडतुसे, २९ तलवारी व २५ चाकू पोलिसांनी हस्तगत केले. जिल्हाभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिशनअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या बक्षीस योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत   आहे. दरम्यान, ही कारवाई ३१ मेपर्यंत अशीच सुरू राहणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली. 


केडगाव व जामखेड हत्याकांडानंतर पोलिसांनी जिल्हाभर मिशन ऑल आऊट सुरू केले. या मिशनअंतर्गत गावठी कट्टे, इतर अवैध हत्यारे, दारू, जुगार, मटक्याची माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. कट्ट्यांची विक्री करणाऱ्या टोळ्या जिल्हाभर सक्रीय असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे मिशन हाती घेतले आहे. मिशनअंतर्गत जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दररोज कारवाई सुरू आहे. पोलिस अधीक्षक शर्मा हे स्वत: या दैनंदिन कारवाईचा आढावा घेतात. एवढेच नाही, तर माहिती देणाऱ्या नागरिकांना ते बक्षीसही देत आहेत. 


गेल्या ३० दिवसांत तब्बल २५६ आरोपी पोलिसांनी अटक केले असून ८११ अारोपींचे वाॅरंट काढण्यात आले आहे. त्याचबरोबर १५ पिस्तुले, २३ जिवंत काडतुसे, २९ तलवारी, २५ चाकू, तसेच इतर हत्यारे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. शिर्डी, श्रीरामपूर, श्रीगोंदा, संगमनेर, नगर शहर आदी ठिकाणी अारोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून सातत्याने दिवसरात्र ही कारवाई सुरू अाहे. हे मिशन ३१ मेपर्यंत असेच सातत्याने सुरू राहणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने मिशनअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे केडगाव व जामखेड सारख्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती न हाेण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या ८८८८३१०००० या मोबाइलवर क्रमांकावर एसएमएस अथवा व्हॅाटस्अपद्वारे गुन्ह्यांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. 


१२ नागरिकांनी मिळवली बक्षिसे 
गावठी कट्ट्यांसह दारू, मटका, जुगार, तसेच फरार आरोपींची माहिती देणारे १२ नागरिक बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत. त्यात दोन जणांनी कट्ट्यांची माहिती दिली आहे, तर इतरांनी दारू, जुगार, मटका व फरार आरोपींची माहिती दिलेली आहे. पोलिस अधीक्षकांनी माहिती देणाऱ्या या नागरिकांचा बक्षीस देऊन गौरव केला. 


नागरीक पुढे येताहेत... 
ग्रामीण भागातील नागरिकांनी बक्षीस योजनेला चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी माहिती दिली, परंतु बक्षीस घेण्यास नकार दिला आहे. मिशनअंतर्गत आतापर्यंत २५६ आरोपींना अटक करण्यात आली. पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे. नागरिक माहिती देण्यास पुढे येत आहेत. उर्वरित फरार आरोपींनाही लवकरच अटक होईल.'' रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक 

 

घरफोड्यांचे सत्र मात्र सुरूच 
जिल्हाभर राबवण्यात येत असलेल्या मिशन ऑल आऊटला चांगले यश मिळत आहे. मात्र, हे मिशन सुरू असताही घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. शहरासह जिल्हाभर घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. घरफोडीसह रस्तालूटीचे गुन्हेही समोर येत आहेत. हे गुन्हे थांबवण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. 


माहिती देणाऱ्यास असे मिळेल बक्षीस 
गावठी पिस्तूल : २५००० 
तलवार, चॉपर : ५००० 
दहशत करणारी टोळी : ५००० 
अवैध सावकारी : २००० 
अवैध दारू : २००० 
जुगार, मटका : २००० 
फरार आरोपी : ५००० 

बातम्या आणखी आहेत...