आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेकप्रकरणी शिवसेना मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचाही पोलिसांवर दबाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर दगडफेक करून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणाऱ्या ६०० शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पंधरा दिवस उलटूनही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांना बदनामीला तोंड द्यावे लागत आहे. शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करू नये, यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांसह खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पोलिसांवर दबाव टाकला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. 


केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, नगरसेवक योगिराज गाडे यांच्यासह ६०० जणांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप एकाही पदाधिकारी व कार्यकर्त्यावर कारवाई झालेली नाही. या सर्वांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, मृतदेहाची विटंबना, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकीकडे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करत आमदारांसह ४४ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. परंतु राजकीय दबावामुळे शिवसेना कार्यकर्त्यांवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पोलिसांनी कारवाई केल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा देत शिवसेनेने एकप्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मृत शिवसेना कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या मृतदेहास तब्बल सात तास पोलिसांना हात लावू न देता मृतदेहाची विटंबना करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीदेखील बाजू घेतली. आता हेच ठाकरे कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नगरला येत आहेत. 


राज्यभर गाजत असलेल्या नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे आदेश शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिले. मात्र, असे आदेश देण्याचे अधिकार मंत्र्यांना नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे कोणत्याही दबावाला बळी न पडता शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरच्या पोलिसांना द्यायला हवे होते. परंतु याप्रकरणी खुद्द फडणवीस यांनीच एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र सध्या आहे. अन्यथा आतापर्यंत गुन्हे दाखल असलेल्या शिवसेनेच्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली असती. केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर बदनामीला तोंड देणाऱ्या नगरच्या पोलिसांना सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. 


एसआयटी पथकी उरले नावापुरतेच 
कोतवालीचे सहायक फौजदार लक्ष्मण भिमाजी हंडाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात ६०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली. श्रीरामपूर येथील अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे व कोतवालीचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांचा या पथकात समावेश आहे. मात्र, हे पथक केवळ नावापुरतेच उरले आहे. आरोपी शहरातच नव्हे, तर महापालिका व पोलिस अधीक्षक कार्यालयातही दिसले, परंतु केवळ राजकीय दबावामुळे त्यांच्या अंगाला हात लावण्याची हिंमत पोलिसांची झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...