आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंद्रीय व आधुनिक शेतीतून रोहोकडी गावाने मिळवली आर्थिक समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओतूर - शेती परवडत नाही, असा नकारात्मक सूर नेहमीच लावला जातो. पण, नियोजनबद्ध व आधुनिक तंत्राने शेती केल्यास ती किती फायदेशीर ठरते, याचे उदाहरण पुणे जिल्ह्यातील ओतूर जवळच्या रोहोकडी गावाने दाखवून दिले आहे. या गावात सर्व समृद्धी शेतीतून आली आहे. गावातील एकूण लागवडयोग्य ३३५ हेक्टर   पैकी निम्मे क्षेत्र पूर्णपणे सेंद्रीय शेती खाली आहे. उर्वरित शेतीचीही सेंद्रीय शेतीकडे वाटचाल सुरू आहे. गावाला पाट-पाणी नाही, पण विहिरीतील पाणी जपून वापरण्यातून (ठिबक सिंचन) त्यांनी आपली शेती बारमाही केली आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांचे योग्य नियोजन, सेंद्रीय शेती, कमीत कमी पाण्याचा वापर, या त्रिसुत्रीचा वापर करून शेतीचा व्यवसाय कसा परवडतो, याचा योग्य तो संदेश गाव देत आहे. 

गावातील ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ३३५ हेक्टर क्षेत्र हे लागवडी योग्य अाहे. त्यापैकी २३५ हेक्टर क्षेत्र निव्वळ बागायत आहे. या मध्ये कांदा आणि टोमॅटो अशी नगदी पिके घेतली जातात. तर, १०० हेक्टर जिरायत असल्याने त्यामध्ये भाजीपाला िकविला जातो. सुमारे ५२५ हेक्टर क्षेत्रात वसलेले रोहोकडी हे गाव स्वकष्टावर आणि कृषी तंत्रज्ञानावर प्रगत झाले आहे.गावात १०५ विहिरी तर १०० शेतकऱ्यांकडे बोअरवेल आहेत. या विहिरी आणि बोअरवेलला वर्षभर मुबलक पाणी असते एवढ्या मुबलक प्रमाणात पाणी असताना देखील पाण्याचा अपव्यय कुठे कोणता शेतकरी करीत नाही. जवळ जवळ ९० टक्के शेती ठीबक सिंचन करून पाण्याची बचत करताना दर्जेदार उत्पन्न घेण्याकरिता येथील शेतकरी अगदी जीव ओतून आटापिटा करताना दिसतो. तालुक्यातील चिल्हेवाडी धरणाचा लाभ येथील शेतकऱ्यांना झालेला आहे. या धरणामुळे विहिरी आटत नाहीत. वर्षभरात कांदा आणि टोमॅटो पिकाचे सुत्रबद्ध नियोजन केले जाते. जास्तीत जास्त सेंद्रीय व जैविक शेती करून उत्पादन खर्चात कपात केली जाते. येथील सुशिक्षित तरुण जास्तीत जास्त प्रमाणात शेती करताना दिसतोय कारण नियोजनबद्ध शेती केली तर शेतीतून देखील विकास साधता येऊ शकतो, असे तरुण शेतकरी सांगतात. येथे कांद्याचे एकरी ३० टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते.सर्व अस्मानी व सुलतानी संकटांवर मात करत रोहोकडी गाव आपला विकास साधत आहे. सर्वत्र सुबत्ता असून या गावात जवळ जवळ घरटी एक दुचाकी व चार चाकी, तसेच ट्रॅक्टर असल्याचे दिसते. गावातील तरुण उच्च शिक्षण घेत आहेत. पण शिक्षणानंतर ते शेती करण्यासाठी गावातच राहतात. या गावात सर्व घरे पक्की आहेत. अनेक ठिकाणी शेतांत बंगले उभे राहिलेले दिसतात. या भागात आल्यानंतर वेगळ्याच प्रदेशात आल्याचा अनुभव येतो. उन्हाळ्यातही हा परिसर हिरवागार दिसतो. कोणत्याही परिस्थितीत हरून न जाता त्या परिस्थितीवर कशी मात करायची, हे येथील शेतकऱ्यांकडून शिकण्यासारखे आहे. टोमॅटो सारख्या पिकाने चालू वर्षी मातीमोल किंमत बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्याला रडायलाच लावले. अक्षरशः उभ्या पिकत नांगर फिरवायला लागला तर काहींनी उपटून फेकून दिला. अशा परिस्थितीत हर न मानता या भागात पुन्हा टोमॅटोची प्रचंड लागवड करण्यात आली आहे. राज्यात नावाजलेला विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर तालुक्यात असताना देखील तालुक्यात इतर गावांमध्ये घेतले जाणारे उसाचे उत्पन्न पाहता रोहोकडी येथे मात्र उसाला शेतकरी थारा देत नाहीत. किंबहुना कमी पाण्यावरील नगदी पिके घेण्याकडेच येथील शेतकऱ्यांचा कटाक्ष आहे. 


वर्षाला १७ हजार टन कांदा 
अवघ्या १३०० लोकवस्तीच्या गावात प्रगत तंत्रज्ञान वापरून वर्षाला १७ हजार ४०० टन कांदा पिकवला जातो. यातील सेंद्रीय कांद्याला प्रचंड मागणी असते. टाटा कंपनीने या गावात सेंद्रीय शेती पिकवणाऱ्यांचा गट तयार केला आहे. तेथे सेंद्रीय मालाची खरेदी केली जाते. कांदा,टोमॅटो या पिकांसोबत इतर भाजीपालाही मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. सेंद्रीय शेती करणारे शेतकरी शेणखत, गांडूळखत, तसेच गूळ, गोमुत्र, डाळीचे पीठ व वडाखालची माती वापरून स्लरी महिन्यातून एकदा पिकांना देतात. त्यामध्ये अतिशय जोमदार पीक येते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...