आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडांच्या मदतीने सत्ता हेच भाजपचे ध्येय, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भाजवर टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची बुधवारी सकाळी भेट घेतली. शिवसेनेतर्फे दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. त्याचबरोबर या कुटुंबांची जबाबदारी शिवसेनेने घेतली असल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले. दरम्यान, केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. गुंडांना पक्षात घेऊन सत्ता स्थापन करणे हाच भाजपचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. हत्याकांडाचा खटला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

 

केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी नगरला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे व सदाशिव लोखंडे, उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. 
पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या काळात मोगलाई माजली आहे. सैनिकांचा अवमान करणारे परिचारक, छत्रपतींबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम व गुंडांना हे सरकार पोसत आहे. भाजप सरकार निष्क्रिय अाहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. या सरकारला गुंडांचा बंदोबस्त करता येत नसेल, तर शिवसैनिक हातात दांडके घेऊन गुंडांना ठेचून काढतील. महाराष्ट्राची अवस्था बिहारप्रमाणे झाली आहे. अशा परिस्थितीत आमच्या मंत्र्यांनी अधिकार वापरले, तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये. हत्याकांडातील आरोपींसह सूत्रधार सत्ताधारी असो किंवा इतर कोणत्या पक्षातील, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. हत्याकांडाच्या तपासासाठी कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या ठाकरे यांनी केल्या. निकम यांच्याशी फोनवर बोलणे झाले असल्याचेही त्यांनी सांिगतले. शिवसेना कोतकर व ठुबे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून दोन्ही कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेने घेतली असल्याचे ठाकरे त्यांनी सांगितले.

 

ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड 

कोतकर व ठुबे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ते पोलिस परेड मैदानावर असलेल्या हेलिकॉप्टरकडे रवाना झाले. बरोबर असलेल्या काही मंत्र्यांसह ते हेलिकॉप्टरमध्ये बसले. परंतु हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. उष्णतेमुळे हा बिघाड झाल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे ठाकरे हे मंत्री विजय शिवतारे यांच्या कारमधून मुंबईकडे रवाना झाले. हेलिकॉप्टरच्या दुरूस्तीसाठी मुंबईहून पथक येणार होते. रात्री उशिरापर्यंत ते आले नव्हते. 


संसार उद््ध्वस्त करणाऱ्यांना फाशी द्या 
केडगावमधील गुंडांनी अनेकांचे संसार उद््ध्वस्त केले आहेत. त्यांना फाशी द्या, अशी मागणी मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. खटला जलदगती न्यायालयात चालवून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, अशी मागणीही या कुटुंबांच्या वतीने करण्यात आली. भविष्यात आणखी कोणाचे संसार उद््ध्वस्त होऊ नयेत, याची काळजी घ्या, अशी विनवणी दोन्ही कुटुंबांच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. 


शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड 
केडगाव दुहेरी हत्याकांड घडताच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेची मागणी करत रास्ता रोको केला. उध्दव ठाकरे हे जगतापांबाबत बोलतील, अशी अपेक्षा होती. परंतु ठाकरेंनी त्यांचे नावही घेतले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नावाचा मात्र ठाकरे यांनी उल्लेख केला. तपास यंत्रणा दबावाखाली असल्यामुळेच कर्डिले यांना जामीन मिळाल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...