आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर दगडफेक, रास्ता रोको ही तर 'नैसर्गिक प्रतिक्रिया'...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर दगडफेक करून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणाऱ्या शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांची खुद्द गृह राज्यमंत्री दीपक केसरकर पाठराखण करत आहेत. अशा प्रसंगात दगडफेक व रास्ता रोको करणे ही तर 'नैसर्गिक प्रतिक्रिया' आहे, अशा शब्दांत त्यांनी आरोपी शिवसैनिकांना पाठीशी घातले. दगडफेक झाल्याचे पुरावे द्या, आम्ही कारवाई करू, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. केसरकर यांच्या या भूमिकेवरूनच गुन्हे दाखल असतानाही शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई का होत नाही, ते स्पष्ट झाले. 

 

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मृत शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी भेट घेतली. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, मंत्री एकनाथ शिंदे, विजय शिवतारे, खासदार चंद्रकांत खैरे व सदाशिव लोखंडे, उपनेते अनिल राठोड यावेळी उपस्थित होते. ठाकरे नगरमध्ये दाखल होण्यापूर्वी गृह राज्यमंत्री केसरकर यांनी सकाळी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा केली. नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दगडफेकप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यांना तपास करू द्या, मग कारवाई करू. नगर शहर गुन्हेगारीमुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यासाठी येथे आलो अाहे. 


पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होऊनही अद्याप कारवाई का होत नाही, असा प्रश्न विचारला असता असे काही झालेले नाही, तुम्ही तेथे होता का? दगडफेक झाल्याचे पुरावे द्या, मगच कारवाई करू, असा उलट सवाल करत केसरकर यांनी गुन्हे दाखल असलेल्या शिवसैनिकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये दगडफेक व रास्ता रोको करणे, ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. अशा घटनांमध्ये पाचशे- हजारचा जमाव असतो. राज्यात अशी अनेक प्रकरणे आहेत, त्यात पोलिसांना योग्य तपास करूनच कारवाई करावी लागते. पोलिस कोणत्याही दबावाखाली काम करत नाहीत. मी येथे शिवसेनेचा आमदार व मंत्री म्हणून आलो नाही, तर राज्याचा मंत्री म्हणून आलो असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या विरोधात पुरावे सापडतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यात काेणीच कोणाच्या बाजूने नाही. नगर शहरात गुन्हेगारी राहणार नाही, सुरक्षित वातावरण राहील, अशीच येथील नागरिकांची अपेक्षा आहे. अशा घटना पुढील काळात घडणार नाही, याची आम्ही काळजी घेणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. 


दगडफेक हे तोडफोडीसारखे प्रकरण नाही 
केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर झालेली दगडफेक व रास्ता रोको हे प्रकरण पोलिस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडीसारखे नाही. दगडफेक ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करून गुन्हेगाराला पळवण्यात आले. अशी घटना राज्यात घडलेली नाही. दगडफेकीचे प्रकरण आता उच्च न्यायालयाकडे आहे. त्यात पोलिसांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना योग्य तपास करावा लागणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...