आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रांत व गटविकास अधिकाऱ्यांचे आदर्श गाव मांजरसुंबेत श्रमदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये यश मिळवायचे असेल, तर प्रत्येकाने त्यासाठी श्रमदान करायला हवे. हे गावातील ग्रामस्थ जाणतात. म्हणूनच आदर्शगाव मांजरसुंबा येथील ग्रामस्थ सकाळी लवकर उठून स्वयंस्फूर्तीने श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. सात वर्षांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण यामध्ये हिरिरीने सहभागी होत आहेत. त्यामुळे गावाला या स्पर्धेअंतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दरम्यान स्मार्टग्राम स्पर्धेसाठी मांजरसुंबा गावाची पथकाकडून पाहणी करण्यात आली. 

 

गावाने आतापर्यंत माती नाला बांध बंदिस्ती, रोपवाटिका, सीसीटी, गॅबियन बंधारे, गली प्लग, डोंगरावरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी करावी लागणारी विविध कामे, यासह तण काढून टाकले आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ अंतर्गत आदर्शगाव मांजरसुंबा येथे ग्रामस्थांसमवेत प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वसंत गारूडकर यांनी श्रमदान केले. यावेळी सरपंच जालिंदर कदम, उपसरपंच रंजना कदम आदी उपस्थित होते.गावातील प्रत्येकजण यामध्ये सहभागी होत आहे. लहान मोठा असा भेदभाव न करता प्रत्येकजण जर श्रमदानात सहभागी झाला, तरच आपण या स्पर्धेत विजय संपादन करू शकतो. याशिवाय गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. कमिन्स कंपनीच्या पुढाकाराने गावात आतापर्यंत विविध प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहकार्याने सरपंच कदम यांच्या पुढाकारातून वृक्षांचे रोपण करून ते जगवण्याचे काम गावाने केले आहे. श्रमदानानंतर ग्रामस्थ स्वखर्चातून नाश्ता पाणी करून आनंद घेतात. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर आज आम्ही अधिकाऱ्यांनी आदर्शगाव मांजरसुंबे गावास भेट देऊन येथे श्रमदान करण्याचा आनंद घेतला. माझी आईसुद्धा या उपक्रमात स्वतः सहभागी झाली होती.ग्रामस्थांना एकत्र करण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरत आहेत. गावाची वाटचाल चांगल्या दिशेने त्यामुळे सुरू झाली होती. श्रमदान चळवळ उभी राहण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ ही स्पर्धा प्रेरक ठरावी, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय स्मार्टग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या प्रत्येकी १ गावाची अशी एकूण जिल्ह्यातील १४ गावांची पथकाने पाहणी केली. यामधून निवड झालेल्या गावाची स्मार्टग्राम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. आदर्शगाव मांजरसुंबे (ता. नगर) गावाची स्मार्टग्राम स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त आरोग्याधिकारी दादासाहेब साळुंके, कर्जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुजित भोग, डॉ. करण नागपूरकर आदींनी गावातील विविध प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली. आरोग्य, रस्ते, शिक्षण, घरपट्टी, पाणीपट्टी, कचरा, जनगणना, स्वच्छता, शाळेची गुणवत्ता, स्वच्छतागृह, गोबर गॅस आदी विविध विषयांवर आधारित निकष स्मार्टग्राम स्पर्धेसाठी आहेत. हे सर्व निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न मांजरसुंबेने केला. पथकाने प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. 

जिल्हास्तरीय स्मार्टग्राम समितीने मांजरसुंबे गावाची पाहणी केली. 


आमची निवड होईल 
मांजरसुंबे गावाने आतापर्यंत विविध स्तरांवरील पारितोषिके मिळवली असून, गावाच्या सर्वांगीण विकासात सातत्य कायम टिकवून ठेवले आहे. या स्मार्ट ग्राम स्पर्धेत आम्ही निश्चितच विजय संपादन करू. तालुकास्तरीय आमची निवड झाली असून, जिल्हास्तरीय आमची निवड होईल व अखेर राज्यस्तरावर आम्ही बाजी मारू, असा विश्वास यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...