आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सीना'तील अतिक्रमणांवर आजपासून बुलडोझर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त राहूलद्विवेदी यांच्या पुढाकारातून शहरातून जाणाऱ्या सीना नदी पात्रातील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग, मोजणी खाते, पाटबंधारे महसूल विभागामार्फत अतिक्रमणे काढण्याची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून (२८ मे) ही अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात होणार आहे. रविवारी सुटीच्या   दिवशीही संबंधित विभागाने कामावर हजर राहून राहिलेल्या नदीपात्राची मोजणी करून हद्द निश्चित केली. 


नगर शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सीना नदीचे सुशोभिकरण व्हावे हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न उदासिन सत्ताधारी व बेजबाबदार प्रशासनामुळे अडगळीला पडला होता. सीना नदी पात्रातील विटभट्ट्या, कच्ची व पक्की बांधकामे, भराव टाकून वाढवलेल्या जागा व त्यावर थाटलेले बेकायदेशीर शेड यामुळे पात्र अरुंद झाले होते. नदीला पूर आल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होऊन मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता केवळ अतिक्रमणांमुळे निर्माण झाली आहे. 'दिव्य मराठी'ने या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधले होते. जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त राहूल द्विवेदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून नदीचा श्वास मोकळा करण्याचा निर्णय घेतला आहे. 


सीना नदीच्या सुशोभिकरणावर राजकारणाचे इमले रचणाऱ्या पुढाऱ्यांनी या नदीचा विकास तर दुरच पण अतिक्रमण काढण्यासाठीही प्रशासनाला पाठबळ दिले नाही. सीना परिसरातील काही नागरिकांनी नदीत भराव टाकून नदीपात्रात पाय पसरले आहेत. बेकायदेशीर विटभट्ट्या महसूल, पाटबंधारे व मनपा प्रशासनाला आजतागायत हटवता आल्या नाहीत. आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्याने सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. 
अतिक्रमण हटवण्याबाबत द्विवेदी यांनी मागील दोन आठवड्यात वारंवार बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सूचना दिल्या. दीड वर्षापूर्वी नदी पात्राची हद्द निश्चित करण्यासाठी पाटबंधारे, मोजणी कार्यालय तसेच मनपाने प्रयत्न केले होते. त्यामुले बहुतांश ठिकाणी हद्द निश्चित झाली आहे. पण अनेक टिळक रस्ता तसेच सावेडीच्या काही भागात मोजणी होऊन हद्द निश्चित करणे बाकी होते. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमणे काढावीत यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपल्यानंतर कारवाईसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली. दरम्यान, रविवारी संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होते. सकाळपासून राहिलेल्या भागाची मोजणी करून पोल रोवण्यात आले आहेत. 


सोमवारी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात होणार आहे, यासाठी दोन मोठे पोकलेन लोखंडी पुलाजवळ थांबवण्यात आले आहेत. तसेच पोकलेनची संख्या ऐनवेळी वाढवण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कारवाईत बाधा येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 


२० ते २५ डपंरची व्यवस्था 
अतिक्रमणे हटवण्यासाठी सहा ते सात पोकलेन मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याबरोबरच २० ते २५ डंपर, ५० ते ६० विविध शासकीय विभागातील कर्मचारी, अधिकारी, मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. पण अतिक्रमण काढण्यास अजून किती दिवस लागतील याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. 

 

आजपासून कारवाई सुरू 
सीना नदीपात्रातील अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पोकलेन मशिन, डंपर आदी आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात होईल.'' सुरेश इथापे, अतिक्रमण विभाग. 

बातम्या आणखी आहेत...