आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे घोटाळ्यात सेनेचे हात बरबटलेले, किशोर डागवाले व गांधी यांचा घणाघाती आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - माजी आमदार अनिल राठोड यांनी दमदाटी करुन लोढा हाईट्मध्ये जागा बळकावली. आम्ही आमचे व्यवसाय जाहीर केले. त्यांनी त्यांचे व्यवसाय जाहीर करावेत. महापालिकेच्या पथदिवे घोटाळ्यात शिवसेनेचे हात बरबटले आहेत. महापौरांच्या अँटीचेंबरमधून या घोटाळ्याची सूत्रे हलली आहेत. शिवालयाची जागा कुणाची आहे. त्या जागेचा उतारा दाखवा, असा प्रश्न खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र तथा नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी बुधवारी केला. पत्रकार परिषद घेऊन खासदार दिलीप गांधी यांचा उल्लेख खावदार केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर भाजप कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शहर उपाध्यक्ष तथा नगरसेवक किशोर डागवाले यांनी सांगितले. 

 

शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन खासदार गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर भाजपने गांधी मैदानातील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. शहर भाजपचे सरचिटणीस किशोर बोरा,ज्येष्ठ नेते श्रीकांत साठे, खजिनदार चेतन जग्गी, शहर उपाध्यक्ष धनंजय जामगावकर, मध्य नगरचे मंडलाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, केडगावचे मंडलाध्यक्ष शरद ठुबे, राहुल रासकर, बंढी ढापसे, आैद्योगिक आघाडीचे प्रमुख विश्वनाथ पोंदे, नितीन शेलार, मिलिंद भालसिंग, प्रशांत मुथ्था व वाहिद कुरेशी यावेळी उपस्थित होते. 


सुवेंद्र गांधी म्हणाले, राठोड यांची वडापावची गाडी होती. त्यांनी अतिक्रमणे केली. त्यांनी स्वत:चे व्यवसाय दाखवावेत. स्वत:च्या उत्पन्नाचे साधन त्यांनी आम्हाला दाखवावे. महापालिकेच्या पथदिवे घोटाळ्यात त्यांचे हात बरबटले आहेत. घोटाळ्याच्या चौकशीत ते पुढे येईलच. महापौरांचे पती हे सर्व करतात. घोटाळ्याची सूत्रे महापौरांच्या अँटीचेंबरमधूनच हलली. तेथे सीसीटीव्ही बसवा. महापालिकेवर प्रशासक नेमण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. महापालिकेचा कारभार ढिसाळ अाहे. ते निक्कमे होते, म्हणूनच आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, असा दावा गांधी यांनी केला. 


किशोर डागवाले म्हणाले, महापालिकेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजप सहभागी होणार नाही. जर भाजपचा कुणी या प्रक्रियेत सहभागी झाला, तर त्याचा अहवाल प्रदेशस्तरावर पाठवला जाईल. त्यावर पुढील कारवाई प्रदेशस्तरावरील होईल. खासदार गांधी यांना खावदार म्हटल्याबद्दल शिवसेनेवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे डागावले यांनी सांगितले. राठोड २५ वर्षे आमदार असताना त्यांना विकासकामे करता आली नाही. पंधरा वर्षांपासून खासदार दिलीप गांधी हे नेतृत्व करत असताना त्यांनी अनेक विकासकामे केली.अनेकांनी उड्डाणपुलासाठी आंदोलने केली. मात्र, या उड्डाणपुलाचा पाठपुरावा गांधी यांनी केला. त्यांच्यामुळेच निविदा निघाली. लिंक रोडसाठी १७ कोटींचा निधी खासदार गांधी यांना आणला. रस्त्यांच्या पॅचिंगसाठी ७० कोटींचा निधी अाणला. नगर-दौंड रस्त्यासाठी त्यांनीच निधी आणला. नगर-बीड-परळी रेल्वेसाठी ३५० कोटींचा निधी आणला, असे त्यांनी सांगितले. पिंपळगाव माळवी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी २९ कोटी व मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटींचा निधी आणला, असे डागवाले म्हणाले. सरचिटणीस किशाेर बोरा म्हणाले, शहरासाठी अमृत योजनेतून शंभर कोटींचा निधी खासदार गांधी यांच्यामुळे मिळाला. मात्र, या निधीतही राठोड यांनी खोडा घालण्याचे काम केले. त्यांच्या निधीतून शहरातील ११ चौकांत हॉयमॅक्स दिवे बसवण्यात आले आहेत. भिंगारसाठी १७ बोअरवेल, तसेच भिंगारमधून जाणाऱ्या रस्त्यांसाठी त्यांनीच निधी आणला. भाजप महापालिकेत कधीच शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होणार नाही, असे त्यांनी सांगितले. 


उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी म्हणाले, भाजपमुळेच राठोड पाच वेळा निवडून आले. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. गांधी यांच्यावर केलेले आरोप त्यांनी सिध्द करुन दाखवावेत.

 
सभापतिपदाचे अर्ज करणारे वाकळे भाजपचे नाहीत 
उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता, तरीदेखील माजी सभापती बाबासाहेब वाकळे, नगरसेवक दत्ता कावरे, नगरसेवक उषा नलावडे यांनी शिवसेनेला मदत केली. मनपाच्या सभापतिपदाच्या निवडणूक अर्ज दाखल करणारे बाबासाहेब वाकळे हे पक्षाचे नाहीत, तरीदेखील त्यांनी अर्ज दाखल केला असेल तर पक्ष कारवाई करेल.'' किशोर डागवाले, उपाध्यक्ष, शहर भाजप. 


खासदार गांधी यांनीच निधी आणला... 
शिवसेनेचे शशिकांत गाडे यांनी शहराच्या विकासासाठी शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निधी आणला, असे सांगितले होते. त्यावर डागवाले म्हणाले, वाकचौरे यांनी नव्हे, तर गांधी यांनी हा निधी आणला. खोटे असेल, तर त्यांना तुम्ही फोन करुन विचारा. राठोड यांनी लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान डागवाले यांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...