आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुफी गायक पवन नाईक यांच्या गायकीवर इराण फिदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- येथील प्रसिद्ध शास्त्रीय व सुफी गायक पवन नाईक यांच्या गायकीवर इराणमधील रसिक फिदा झाले. इराणचा तिसरा दहा दिवसांचा दौरा पूर्ण करून नाईक नुकतेच नगरला परतले. 


इराण येथील सुप्रसिद्ध पॉप गायक रुजबे नेहमतुल्लाही यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. आशिया खंडातील द्वितीय क्रमांकाच्या सर्वात उंच बूर्ज-ए-मिलादमध्ये झालेल्या मैफलीत जागतिक स्तरावरील वादकांची साथसंगत पवन नाईक यांना लाभली. 'मिल्लत-ए-इश्क' या शास्त्रीय व सुफी, तसेच हिंदी व फारसी स्वर-शब्द व संस्कृतीचा मेळ साधणाऱ्या या मैफलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 
भारतीय शास्त्रीय संगीतातील अष्टांगप्रधान तत्वातील आलाप, बोलआलाप, तान, बोलतान, लयकारी, मींड, गमक, खटका, मुर्की व जमजमा पवन नाईक यांनी मैफलीत सादर केले. त्यांना विवेक सॅम्युएल (मोहनवीणा), रामदास विजय (तबला), वाहिद आर्यन (तंबूर), मोज्दबा कलंतरी (सतार व डफ), करण झियारी (पियानो व सिंथेसायझर), कियारश अमिरी रद (हॅग ड्रम), शहरीयार बदानी (बास गिटार), नीमा गाफिरी (ड्रम्स), पयाम रोगन (डीजीडू), फरजाद कबिरी (बोझुकी), फरहद रुस्तमी (स्पॅनिश गिटार), गीर्रर्द अझरीयान (इलेक्ट्रॉनिक गिटार), मेहमूद मालेक्ला (सहवाद्य), सहरा शातेरी (काहून) आदींनी साथसंगत केली.

 
इराणमधील जागतिक कीर्तिचे शास्त्रीय गायक उस्ताद शहरम नाझेरी यांच्या उपस्थितीतही पवन नाईक यांची मैफल झाली. वाहिद आर्यन व मोज्दबा कलंतरी यांच्या विशेष प्रयत्नांतून या खासगी मैफलीचे आयोजन करण्यात आले. इराण दौऱ्यादरम्यान रुजबे नेहमतुल्लाही यांनी गायलेल्या 'तथना हू या हू' या फारसी गीतासाठी सरगम व आलापांचे ध्वनिमुद्रण झाले. लवकरच हा अल्बम आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणार असल्याचे पवन नाईक यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...