आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राठोडच शहराचे आमदार; बुलंद आवाज त्यांचाच! आदित्य ठाकरे यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेसिडेन्सिअल विद्यालयात आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. छायाचित्रे : साजित शेख - Divya Marathi
रेसिडेन्सिअल विद्यालयात आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. छायाचित्रे : साजित शेख

नगर- शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले, एक आवाज कमी जाणवतो. तो अनिल राठोड यांचा आहे. नगरचे आमदार अनिल राठोडच आहेत. बुलंद आवाज त्यांचाच आहे. मला वचन द्या, पुढील निवडणुकीत शिवसेनेचा हा हक्काचा आमदार आम्हाला परत पाहिजे. शिवसेनेची एक हाती सत्ता येणार त्यावेळी हा आमदार तेथे विधानसभेत पाहिजे, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 


युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची गुरुवारी प्रोफेसर कॉलनी चाैकात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर सुरेखा कदम, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, सभापती सचिन जाधव, रवी वाकळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शीला शिंदे, घनश्याम शेलार, संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे विक्रम राठोड आदी उपस्थित होते. 


ठाकरे म्हणाले, रोड शोनंतर घेऊ असे सांगितले होते. कारण गोंधळ असा होतो की, खुर्च्या रिकाम्या राहतात. पण गुजरातमध्ये जशा खुर्च्या रिकाम्या राहतात, तशा आपल्या येथे रहात नाहीत. महाराष्ट्र तापला असला, तरी निवडणुका केव्हा होणार माहिती नाही. 


मी २०१४ मध्ये मते मागायला नगरला आलो होतो. शिवसेनेचे ६३ आमदार आले, पण एक आमदार कमी होता. तो आवाज उपनेते अनिल राठोड यांचा आहे. नगरचे आमदार राठोडच आहेत. कारण बुलंद आवाज त्यांचाच आहे. मला तुमच्याकडून वचन द्या, पुढील निवडणुकीत शिवसेनेचा हा हक्काचा आमदार आम्हाला परत पाहिजे. देणार का ? कारण तुमच्यासाठी लढायला शिवसेनेची एक हाती सत्ता येणार, त्यावेळी हे आमदार तेथे पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. 


एरवी पक्ष प्रवेशासाठी आम्ही शिवसेना भवनात बोलावतो. पण मागील आठवड्यात मी एवढे कौतूक ऐकले की, नेमका कोण आहे, बघावे लागेल. त्यानंतर मी नगरला येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वाकळे यांच्या हातात शिवबंधन नव्हते, पण मला त्यांचे रक्त भगवे दिसत होते. हा उत्साह पाहिल्याने मी दर दोन महिन्यांनी नगरला येईन. 


व्यावसायिकांचा धंदा बुडाला 
सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात दररोज सकाळी नाष्ट्याची सोय विविध स्टॉलमध्ये उपलब्ध करून दिली जाते. या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थ, तसेच भाजीपाला व्यावसायिकांना दैनंदिन विक्रीतून रोजगार उपलब्ध होतो. परंतु, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेमुळे या सर्व व्यावसायिकांचे एक दिवसाचे उत्पन्न बुडाले. 


नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न 
मनपाची सातशे एकर जागा आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. आयटी, इंजिनिअर झाल्यानंतर मुंबई, पुण्याला जावे लागते. त्यामुळे एमआयडीसीत जास्तीत जास्त कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. उद्योग उभारणी, तसेच पर्यटनासाठी अनिल राठोड आवाज पाठवतीलच. मीदेखील मदत करणार आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 


तीन कोटींपैकी एक जण दाखवा 
सबसिडी काढून घेतली असून तीन कोटी महिलांना फायदा झाल्याचे होर्डिंग लावले जातात. या तीन कोटींपैकी एक तरी महिला दाखवा, ज्यांना लाभ मिळाला आहे. याची यादी आम्ही मागितली आहे. नोटबंदीमुळे श्रीमंत माणूस रस्त्यावर येईल, असे सांगितले. असा कोणताही श्रीमंत माणूस रस्त्यावर दिसला नाही, अशा कानपिचक्या भाजप सरकारला घेतल्या. 


विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचे संकेतस्थळ 
आदित्य ठाकरे यांचे नगर शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी रेसिडेन्शिअल विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी दप्तराचे ओझे यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनीही दिलखुलासपणे आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नवीन टॉपस्कोर या संकेतस्थळाविषयी माहिती दिली. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे, शिक्षणपद्धतीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेने सुरू केलेल्या संकेतस्थळाबाबत माहिती देण्यात आली. या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाची माहिती उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 


वाकळे यांचा रोड शो 
रवीवाकळे यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढली. कार्यकर्ते मोटारसायकली, चारचाकी घेऊन सहभागी झाले रॅली प्रेमदान चौकातून प्रोफेसर कॉलनी चौकात पोहोचली, त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. वाकळे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून मंचापर्यंत आणले. 

बातम्या आणखी आहेत...