आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी उचलताहेत देशातील शांतता भंग करणारी पावले; माजी न्यायमूर्ती कोळसे यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- उन्नाव व कठुआच्या अमानवीय बलात्काराच्या घटना तसेच न्या. लोया प्रकरण देशासाठी अत्यंत भयसूचक काळ येत असल्याचे संकेत आहेत. लोकशाही व घटनात्मक चौकटीला या सर्व घटना आव्हान देत आहेत. सजग भारतीयांनी या संदर्भात जागृत होण्याची आवश्यकता आहे. देशातील सत्तेवर असलेल्या शक्ती आज देशातील शांतता भंग करणारी पावले उचलत अाहे, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी केला. 


मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कोळसे यांच्या हस्ते अखिल भारतीय किसान सभेने देश स्तरावरील शेतकरी प्रश्नावर सुरू केलेल्या दहा कोटी स्वाक्षरी मोहिमेची नगर जिल्हा स्तरावरील सुरुवात शुक्रवारी दुपारी अकोल्यातून केली. याप्रसंगी कोळसे बोलत होते. अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर हा कार्यक्रम पार पडला. यापूर्वी शेतकऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या या सुकाणू समितीत माजी न्यायमूर्ती कोळसे सहभागी होते. राज्य सरकारने दहा हजार रुपये मदतीचा शासनादेश काढताना जाचक अटी शर्ती लावल्यावर त्या विरोधातील संघर्षात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. 


माजी न्यायमूर्ती कोळसे यांच्या सहीने या मोहिमेच्या अर्जावरील पहिली सही करून नगर जिल्ह्यातून अभियानाची सुरुवात करण्यात आली. सुकाणू समितीच्या अनेक संघटना या अभियानात सहभागी आहेत. विविध सहभागी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शासनाने केलेल्या तथाकथित शेतकरी कर्जमुक्ती, शेती मालाला दीडपट हमी भाव, स्वामिनाथन् आयोगाची अंमलबजावणी अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी देश स्तरावर दहा कोटी सह्या संकलित करून निर्णायक आंदोलन उभे करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांची सुकाणू समिती अहमदनगर, या सुकाणू समितीत सामील संघटनांना सोबत घेऊन या मोहिमेचा विस्तार करणार असल्याचे या वेळी कोळसे यांनी सांगितले. 


कर्जमुक्तीची लढाई अजून संपली नसल्याने भावी काळातही शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. सुकाणू समितीचा व शेतकरी आंदोलनाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करणारांपासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याची सूचनाही कोळसे यांनी केली. 


यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. अजित नवले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अॅड. शांताराम वाळुंज, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक डॉ. संदीप कडलग, रोहिदास धुमाळ, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक महेश नवले, प्रदीप हासे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष लालुशेठ तथा रावसाहेब दळवी, खंडू वाकचौरे, सेवानिवृत्त प्राचार्य शांताराम गजे, शांताराम संगारे, सदाशिव साबळे, आदित्य शेटे, लक्ष्मण नवले, सुभाष येवले, किरण चौधरी, लक्ष्मण आव्हाड, नारायण एखंडे, भाऊसाहेब वाकचौरे, दिलीप शेणकर, निरंजन देशमुख, ओंकार नवळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. संदीप कडलग यांनी केले. स्वागत महेश नवले यांनी केले. 

 

आशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू 
देशभरात कार्यरत असणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे नियमित वेतन सुरू करावे, या मागणीचे निवेदन आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने कोळसे यांना देण्यात आले. दिल्लीला गेल्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन आशा कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कोळसे यांनी भारती गायकवाड, संगीता पथवे व उषा अडागळे या आशा कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

बातम्या आणखी आहेत...