आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरीचा लोकनेता हरपला: ‘तनपुरे’चे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली प्रवरा- राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रामदास विश्वनाथ धुमाळ यांचे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता मुसळवाडी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी शकुंतलाबाई, मुले विलास, अजित सुधीर आणि मुलगी लीलाबाई नागवडे असा परिवार आहे. 


धुमाळ हे नाना नावाने ओळखले जात. १९६९ मध्ये धुरंधर राजकारणी डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या विरोधात मतदार जागृती मंडळ स्थापन करून धुमाळ यांनी राजकीय मुहूर्तमेढ रोवली. दादा इंगळे, प्रभाकर मेहत्रे, विठ्ठलराव डावखर, हौशीनाथ लोहार यांचा त्यांना मोलाची साथ मिळाली. १९७० मध्ये हे मंडळ कारखान्याच्या सत्तेत आले. नंतर काशिनाथ पवार यांना बरोबर घेत नानांनी राहुरी तालुका विकास मंडळाची स्थापना केली. तनपुरे यांचे जनसेवा धुमाळ यांचे विकास मंडळ असा सत्ता संघर्ष होत राहिला. 


विकास मंडळात धुमाळ, सुभाष पाटील रावसाहेब साबळे या त्रयीने तालुक्यात मोठे कार्य उभे केले. धुमाळ हे मुळा-प्रवरा वीज संस्था, तसेच तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष झाले. मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या माध्यमातून धुमाळ यांनी ४०० केव्ही वीज उपकेंद्रांची निर्मिती केली. आजही जिल्ह्यातील सर्वात जास्त वीज उपकेंद्रे मुळा-प्रवरा कार्यक्षेत्रात आहेत. तालुक्यातील ओढ्या-नाल्यांवर पन्नासपेक्षा जास्त बंधारे त्यांच्या काळात बांधले गेले. १९७२ मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ स्थिती असताना राहुरी कारखान्याच्या वतीने जनावरांसाठी पहिली चारा छावणी सुरू करण्याचा मान धुमाळ यांच्याकडेच जातोय. त्यावेळी सरकारने या चारा छावणीचा पथदर्शक प्रकल्प म्हणून गौरव केला होता.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, विवेकानंद नर्सिंग होम, तसेच इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून धुमाळ यांनी अनेक तरुणांचे प्रपंच उभे केले. सत्तासंघर्षात अनेक वेळा धुमाळ यांचे पारडे कधी खाली कधी वर होत राहिले. पण दिलेला शब्द पाळणारा नेता अशी त्यांची तालुक्यात ओळख होती. विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यकर्ते उभे केले. ज्येष्ठ नेते शरद पवार, नारायणगिरी महाराज, बाळासाहेब विखे, शंकरराव काळे, विलासराव देशमुख यांच्याशी धुमाळ यांचे निकटचे सबंध होते. 


मान्यवरांकडून श्रद्धांजली 
आमदारशिवाजी कर्डिले, विखे कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे, माजी आमदार प्रसाद तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, अॅड. सुभाष पाटील, दादानाना इंगळे, गोपाल अग्रवाल, सुरसिंग पवार, रावसाहेब साबळे, गौतम साखर कारखान्याचे अध्यक्ष अशुतोष काळे, अण्णा बाचकर, भाऊसाहेब यवले, तान्हाजी धसाळ, सचिन गुजर, अप्पासाहेब कदम, करण ससाणे, वसंत देशमुख, बी. जे. देशमुख, शिवाजी गाडे, राजेंद्र जाधव, बाळासाहेब जठार, आसाराम ढूस, अप्पासाहेब शिंदे आदींनी धुमाळ यांना श्रद्धांजली वाहिली. 


धुरंधरनेत्याला तालुका मुकला... 
आमदार कर्डिले म्हणाले, कार्यकर्ता कसा उभा करावा हे नानांना माहीत होते. ते गेल्यामुळे राहुरी तालुक्याची हानी झाली. 

बातम्या आणखी आहेत...