आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना सापडेनात घरफोडी धूमस्टाइल चोर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुरुडगाव रस्त्यावरील अर्बन बँक कॉलनी येथील रहिवासी डॉ. देशमुख यांच्या घरात सोमवारी पहाटे घरफोडी करून अशी उचकापाचक केली. छाया : वर्धमान लुणावत. - Divya Marathi
बुरुडगाव रस्त्यावरील अर्बन बँक कॉलनी येथील रहिवासी डॉ. देशमुख यांच्या घरात सोमवारी पहाटे घरफोडी करून अशी उचकापाचक केली. छाया : वर्धमान लुणावत.

नगर- घरफोडी झाली... नोंदवा फिर्याद, धूमस्टाइल दागिने पळवले... घ्या फिर्याद... तपास लागेल तेव्हा लागेल... अशी भूमिका एकीकडे पोलिस घेत आहेत, तर दुसरीकडे अमूक टोळीतील आरोपी पकडले, आता चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल, असा दावा पोलिस करत आहेत. मात्र, शहरात सोमवारी एकाच दिवशी एक घरफोडी दोन धूमस्टाइल चोरीच्या घटना घडल्या. वाढत्या चोऱ्यांचे हे सत्र सुरूच असल्याने पोलिसांचा दावा खोटा ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना पोलिस केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नगरकर करत आहेत. 


लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेलेल्या माणिकनगर (बुरुडगाव रस्ता) येथील रहिवासी डॉ. अजय देशमुख यांच्या घरावर चोरट्यांनी सोमवारी पहाटे डल्ला मारला. घरातील मूल्यवान वस्तुंसह सोन्याची दागिने, रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरट्यांनी लांबवला. विशेष म्हणजे घरफोडी झाल्याची माहिती मिळूनही कोतवालीचे पोलिस दुपारी उशिरापर्यंत घटनास्थळी फिरकले नाहीत. या घरफोडीचा पंचनामा होत नाही, तोच सपकाळ हॉस्पिटल रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील तोळ्याचे गंठण चोरट्यांनी धूमस्टाईल लांबवले. याच वेळी निर्मलनगर येथील भगवान बाबा चौकाजवळील गंगा लॉन येथे एका महिलेच्या गळ्यातील तोळ्याचे गंठण धूमस्टाइलनेच लांबवण्यात आले. 


धूमस्टाईलच्या या दोन्ही घटना एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकणी घडल्या. स्वाती मैड (लोणी प्रवरा) या लग्न समारंभ उरकून आईवडिलांच्या घराकडे पायी चालल्या होत्या. वृंदावन मंगल कायार्यालयाकडून सपकाळ हॉस्पिटल रस्त्याने चालत असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तोळ्यांचे गंठण हिसकावले. तर निर्मलनगर येथील गंगा लॉन येथील लग्न समारंभांसाठी आलेल्या हिंगणे यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठण धूमस्टाइलने लांबवले. शहरात विविध भागात दररोज अशा घटना सर्रास घडत आहेत. घरफोडी, दरोडा, जबरी चोरी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत नगरकर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. 


घरफोड्यांचे प्रमाण सर्वाधिक 
शहरासहजिल्ह्यात घरफोडी दरोड्यांच्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशी कबुली खुद्द पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी नगर दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली होती. मात्र, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अद्याप कागदावरच आहेत. त्यात पोलिस ठाण्यांची भूमिकाही करू, पाहू, अशी आहे. गुन्हा दाखल करून त्याचा तपास लावण्याची तसदी देखील पोलिस घेत नाहीत. त्यामुळेच घरफोडी धूमस्टाइल चोरांना पाठबळ मिळत आहे. 


पोलिस अधीक्षकांना घालणार घेराव 
बुरुडगावपरिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्यामुळेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले. चाेरांना पकडण्याचे सोडून फिर्याद देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पोलिस दोन ते तीन तास बसून ठेवतात. गुन्हा घडल्यावर सर्वात जास्त आनंद पोलिसांनाच होतो. पोलिसांनी गुन्हेगारांच्या तत्काळ मुसक्या आवळाव्यात, अन्यथा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी सोमवारी दिला. 

बातम्या आणखी आहेत...