आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांच्या महिलांना पॅकेजिंगचे प्रशिक्षण देणार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्यातील बचत गटांच्या महिलांना उत्पादनाच्या पॅकेजिंगचे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांनी मंगळवारी केली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने तांबटकर मळा येथे आयोजित करण्यात आलेल्या साईज्योती प्रदर्शनात त्या बोलत होत्या. मृद जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, महापौर सुरेखा कदम, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, उमेश परहर, अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, वसंत गारुडकर आदी उपस्थित होते.

 

मंत्री मुंडे म्हणाल्या, पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात आपण राहतो. स्त्रीला घराचा उंबरठा आेलांडून काम करणे कठीण झाले आहे. तिला पैशांसाठी वडिलांपुढे, पतीपुढे हात पसरावे लागतात. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार दारिद्रय निर्मूलन चळवळ राबवत आहे. कुणाचे घ्यायचे ते बुडवायचे ही महिलांची प्रवृत्ती नाही. त्यामुळे या महिलांना ताकद देण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची योजना सरकारने सुरु केली आहे. तीन वर्ष नियमित कर्ज फेडले, त्यांना शून्य टक्क्याने कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. या योजनेंतर्गत २८ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. बँकेचे रेकॉर्ड चांगले असेल, तर या महिला बचत गटांना आणखी कर्ज दिले जाईल. भविष्यात बचत गटांच्या महिलांना उत्पादनाच्या प्रॅकेजिंगचे प्रशिक्षण दिले जाईल. तुमच्या उत्पादनाचे प्रेझेंटेशन चांगले असणे आवश्यक आहे. स्त्री आजही आर्थिक स्वतंत्र झालेली नाही. स्त्री भ्रूण हत्या होत असल्यामुळे सरकरने बेटी बचाआे बेटी पढाआे हे अभियान सुरु केले आहे. त्याचा चांगला परिणाम दिसत असून, मुलींचा जन्मदर वाढला आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरु करण्यात आली आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी सिंदखेडा येथून बेटी सन्मान यात्रा सुरु करण्यात येणार आहे. वळदगाव, चोंडी नायगाव येथे ही यात्रा जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. दहा हजार मुलींना माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळाला आहे. बचत गटांची चळवळ ही तर सुरुवात आहे. ही चळवळ प्रभावी होऊन महिलांचे चांगले संघटन उभे राहणार आहे. त्या माध्यमातून महिला सक्षम होतील. ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी सर्वांची आहे. शहरातील सुविधा ग्रामीण भागाला दिल्या जाणार आहेत. आगामी दहा वर्षांत ग्रामीण भाग हा शहरापेक्षा जास्त विकसित असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार गांधी म्हणाले, महिला बचत गटांच्या उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. महिलांनी एकत्रित येऊन उत्पादन निर्मितीसाठी कंपन्या सुरु कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे म्हणाल्या, बचत गटांच्या महिलांना उत्पादन तयार करण्याबाबत, तसेच त्याचे मार्केंटिंग करण्याबाबत प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. महिला बचत गटांमार्फत सेंद्रीय शेती सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त झगडे म्हणाले, ग्रामीण भागात रोजगार नसल्यामुळे ८५ टक्के लोक शहराकडे आले आहेत. केवळ ५४ टक्केच लोक शहरी भागात राहतात.महिला बचत गटांमार्फत तयार होणारे उत्पादनाचे मार्केट जगभर जाऊ शकतो. ऑनलाईनच्या काळात महिला बचत गटांच्या या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग झाले पाहिजे. महिला बचत गटांच्या कर्जाबाबत आपण लवकर लीड बँकेची बैठक बोलावून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नगरमधील हे बचत गटांचे प्रदर्शन जागतिक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

अंमलबजावणी व्हावी
वाळूचोरीरोखण्यासाठी सक्षम कायदा आहे. जो पूर्वी कायदा होता, त्यात आता बदल करण्यात आला आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत वाळूचोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना अधिकार देण्यात आले आहेत. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

नाराज केले नाही
उशिराआल्याबद्दल मुंडे यांनी दिलगिरी व्यक्त करत खासदार गांधी यांच्याकडे पाहून तुम्ही तीन टर्म खासदार आहेत. मी कधी वेळेवर आले का? असा सवाल करुन माझा बाप कधी वेळेवर आला का? त्यांना जे जमले नाही, ते मला कसे जमेल? माझ्या पित्याला लोकांना नाराज करणे जमले नाही, ते मला कसे जमेल? लोकांना नाराज करणे कधी जमलेच नाही, असे मुंडे यांनी सांगितले.

 

‘अस्मिता ब्रँड’
स्वयं सहायताबचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने स्वतःचा ‘अस्मिता ब्रँड’ विकसित केला आहे. मुंबई येथे महालक्ष्मी सरस या राज्यपातळीवर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील उत्पादनाला मुंबईत मोठी मागणी असते. आपणही या प्रदर्शनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...