आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ सर्वेक्षणामुळे संगमनेर बदलतेय, शौचालयांचे रुपडे बदलले; स्वच्छ सर्वेक्षणात १६ व्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- स्वच्छ सर्वेक्षण अभियानामुळे संगमनेर शहराचे सध्या चित्र बदलत आहे. दररोज अभियानाची रँकिंग शासनाच्या संकेतस्थळावर बदलत असल्याने पहिल्या टॉप टेन शहरामध्ये येण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने पावले टाकली आहेत. सुरुवातीला ३७४ व्या क्रमांकावर असलेले संगमनेर रविवारी या अभियानात ४०४१ शहरांमध्ये १६ व्या स्थानावर होते. शहरात वेगाने अभियानाला गती मिळाली आहे. 


नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मुख्याधिकारी सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे प्रशासन मध्यरात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपासून शहरात फिरून काम करत आहेत. अभियानामुळे संगमनेरातील रस्ते आता कचरामुक्त होत आहेत. एरवी आेसंडून वहात असलेल्या कचराकुंड्या जाऊन आता त्या जागी छानशा आेल्या आणि सुक्या कचऱ्यासाठीच्या डस्टबीन आल्या आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण होऊन त्याची विल्हेवाट लावणे सोपे जाऊ लागले. काही ठिकाणे कचरामुक्त करण्यात नगरपरिषदेला यश मिळाले आहे. दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर नगरपरिषदेने गांडूळ खत प्रकल्प सुरू केला. घराघरातून डस्टबीनद्वारे कचरा गाड्यात टाकला जाऊ लागला आहे, तर अनेकांनी घरातील कचरा घरच्या घरी जिरवण्यास सुरुवात केली. शहरातील अनेक कुटुंबांनी शून्य कचरा कुटुंब म्हणून आेळख निर्माण केली. शहरातील शौचालयात जाणे म्हणजे दिव्य पार पाडण्यासारखे होते, तीच शौचालये आता वेगळी आेळख घेऊन समोर आलीत. शौचालयांची दुरुस्तीच झाली नाही, तर त्यांना रंगकाम आणि परिसर स्वच्छ झाल्याने शौचालयेही अशी असू शकतात का? असा प्रश्न पडला आहे. दिव्यांगांसाठीही या शौचालयांना रॅम्प बसवले आहेत. 


शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे मार्गावरील रस्ता दुभाजकात वृक्षारोपण करण्यात आले आहे. या दुभाजकालादेखील नगरपरिषदेने रंगरंगोटी केली. स्वच्छता अभियानात ३ जानेवारीचा अपवाद वगळता नगरपरिषदेने केने सातत्याने आपला क्रमांक वरचा ठेवला. ३७४ व्या स्थानावरील संगमनेर आता थेट १६ व्या क्रमांकावर आल्याने अभियानात वरचढ ठरण्यासाठी संगमनेरकरांच्यादेखील आशा वाढल्या आहेत. 


अशी आहे अभियानातील नगरपरिषदेची स्थिती 
- ६५८०० पेक्षा अधिक लोकसंख्या. 
- ७६५६ नागरिकांनी स्वच्छता अॅप केले डाऊनलोड 
- ३७९२ नागरिकांनी केल्यात तक्रारी, ते ठरलेत अॅक्टीव्ह युझर, तर जवळपास निम्म्यापेक्षा अधिक ३८६४ नागरिक नॉन अॅक्टीव्ह, आतापर्यंत २१,७३१ तक्रारी अॅपवर प्राप्त झाल्या, त्यापैकी २०,९४२ तक्रारींची सोडवणूक झाली. १३२ तक्रारी नाकारण्यात आल्या. 
- ११,९२० पैकी ११,६४६ नागरिकांनी तक्रारीबद्दल समाधानी असल्याचे सांगितले. 


नागरिकांचा सहभाग वाढावा 
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नागरिकांचा सहभाग वाढण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी स्वच्छता अॅपचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या कचऱ्यासंबंधीच्या तक्रारी त्यावर टाकाव्यात. प्रशासन या तक्रारी सोडवेल. शहर स्वच्छतेमुळे नागरिकांचेच आरोग्य सुरक्षित राहून रोगराई दूर पळेल. स्वच्छता अभियानाचा फायदा नागरिकांनाच होणार आहे. स्वच्छता दुतांमार्फत शहरात नागरिकांचे प्रबोधन सुरू आहे.
- दुर्गा तांबे, नगराध्यक्ष. 


उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष 
नागरिकांनी अभियानात सहभाग द्यावा, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिक बंदी आदेशाचे पालन करावे, रस्त्यावर कचरा टाकू नये, डस्टबीनद्वारे आपल्या परिसरात येणाऱ्या घंटागाडीतच तो टाकावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कठोर कारवाई केली जाईल. नगरपरिषदेने कारवाया करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. पथक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे.
- डॉ. सचिन बांगर, मुख्याधिकारी. 

बातम्या आणखी आहेत...