आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघींच्या नाट्यमय माघारीनंतर अकोले नगराध्यक्षपदी शेटे; आज होणार अधिकृत घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- अकोले नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या नगरसेविका सोनाली नाईकवाडी, बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या नगरसेविका निशिगंधा नाईकवाडी यांनी मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने नगराध्यक्ष म्हणून संगीता शेटे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नवीन नगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (२३ मे) होत आहे. 


अकोले नगरपंचायतमध्ये एकूण १७ नगरसेवक आहेत. पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १० सदस्य, काँग्रेस पक्षाचे ३, शिवसेना १, भाजप १ व अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. एकूणच १७ सदस्य संख्या असलेल्या या नगरपंचायतमध्ये १० महिला सदस्या आहेत. नवीन नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे नेते मधुकर नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा काँग्रेसच्या या तीनही नगरसेवकांनी आम्ही मात्र अजूनही काँग्रेसमध्येच आहोत, असे माध्यमांतून जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा इन्कार केला होता. पण नंतर नगर येथे गटनोंदणी करताना मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच नोंदणी केली होती. या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद सोडतीने ओबीसी महिला राखीव निघाल्याने नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढली. नगराध्यक्ष पदासाठी ज्या महिला नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली, त्यापैकीच उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी श्रेष्ठींकडे धरला. मात्र, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून संगीता शेटे यांना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी विचारात घेण्यात आली नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत बंडाचे निशाण फडकावून आपला विरोध नोंदवला. म्हणून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत श्रेष्ठींनी उपनगराध्यक्ष पदाची लालूच दर्शवली होती, पण तीही धुडकावून लावली व बंड करून उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी दुपारी दोन वाजता अर्ज माघारीची मुदत होती. 


या पदासाठी २३ मे रोजी दुपारी दोन वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. अज्ञातस्थळी गेलेल्यांना बुधवारी सकाळी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अकोल्यात हजर करण्यात येणार आहे. 


अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सोनाली नाईकवाडी व निशिगंधा नाईकवाडी यांनी मंगळवारी माघार घेतल्याने शेटे यांचा बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. सध्या उपनगराध्यक्ष पदाची सूत्रे प्रकाश नाईकवाडी यांच्याकडे आहेत. या घडामोडी घडत असताना चर्चा अशी आहे की, राष्ट्रवादीचे नगरसेवक व गटनेते बाळासाहेब वडजे यांच्यावरच उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे श्रेष्ठींनी ठरवलेले आहे. 


अकोलेच्या विकासासाठी कटिबद्ध 
निशिगंधा नाईकवाडी व सोनाली नाईकवाडी यांनी माघार घेतल्याने माझा बिनविरोध नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, नगराध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतमधील सर्व नगरसेवक, नगरसेविका यांना बरोबर घेऊन आपण अकोलेच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.
- संगीता शेटे, नगराध्यक्ष, अकोले नगरपंचायत.


अकोले नगरपंचायतमध्ये भावी नगराध्यक्ष काँग्रेसचाच होणार 
अकोले नगरपंचायतमध्ये काँग्रेसच्या तीन नगरसेविका आहेत. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नाही. नगराध्यक्षपदासाठी निशिगंधा नाईकवाडी यांचा अर्ज आम्ही दाखल केला होता. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या संगीता शेटे यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केला आहे. यामुळे अकोले नगरपंचायतमध्ये भावी नगराध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार असल्यानेच मंगळवारी निशिगंधा नाईकवाडी यांचा अर्ज आम्ही मागे घेतला.
- बाळासाहेब नाईकवाडी, कार्याध्यक्ष, काँग्रेस. 


तेव्हा मतदारांना सहलीवर नेऊन दाखवा 
नगरसेविका निशिगंधा नाईकवाडी यांनी ठरल्याप्रमाणे साथ दिली नाही. आवाजी पद्धतीने हात वर करून मतदान घेेणार असल्याचे समजताच शिवसेना नगरसेवक प्रमोद मंडलिक वगळता उर्वरित सर्वांनी मला समर्थन देण्यास नकार दिला. या सर्वांवर गेल्या दोन दिवसांत संबंधितांनी दबाव वाढवला होता. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाविरोधात काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळेच मी अर्ज मागे घेतला. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहे. तेव्हा १५ हजार मतदारांना त्यांनी अज्ञातस्थळी नेऊन दाखवावे.
- सोनाली नाईकवाडी, नगरसेविका. 

बातम्या आणखी आहेत...