आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींच्या 12 व्या वंशजाकडून चौथे शिवाजी महाराजांना अभिवादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ब्रिटिशांची गुलामगिरी नाकारणारे कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज नगरच्या भुईकोट किल्ल्यात हुतात्मा झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज असलेल्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी रविवारी सायंकाळी भुईकोट किल्ल्याला भेट दिली. चौथे शिवाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले, तेथील वृंदावन आणि पुतळ्याचेही त्यांनी सोमवारी सकाळी दर्शन घेतले. 


किल्ल्यात कर्नल राजबीरसिंग यांनी महाराजांचे स्वागत केले. भूषण देशमुख यांनी त्यांना किल्ल्याविषयी माहिती दिली. यावेळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चौथे शिवाजी महाराजांना नेमके कुठे ठेवले, याचा तपशील कोल्हापूरच्या पुराभिलेखात उपलब्ध होऊ शकेल, असे शाहू महाराज यावेळी म्हणाले. या किल्ल्याचे पुरातत्वीय सर्व्हेक्षण होणेे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 


किल्ल्यातील नेता कक्ष, दिवाणे आम, त्यामागील भुयारी मार्ग, बारूदखाना, जुने महाल आदींची पाहणी शाहू महाराजांनी केली. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून त्यांना 'डिस्कव्हर अहमदनगर' हे पुस्तक भेट देण्यात आले. त्याआधी त्यांनी रणगाडा संग्रहालय व फराह बख्क्ष महालाला भेट दिली. सोमवारी सकाळी महाराजांनी पुण्याला जाताना न्यू आर्टस् महाविद्यालयासमोरील चौथे शिवाजी महाराजांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. माळीवाडा बसस्थानक चौकातील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही त्यांनी अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ते सुनील काळे यांनी महाराजांचे स्वागत केले. यावेळी लेफ्टनंट कर्नल आशिष सुतार, न्यू आर्टस््चे रजिस्ट्रार शिवाजी साबळे, अमोल सुरसे, अनंत पुंड आदी उपस्थित होते. 

 

स्मृती जतन करायला हव्यात 
आपली संस्कृती व इतिहास वैभवशाली आहे. सर्वांनी आपल्या या इतिहासाचा अभ्यास करुन त्यातून स्फूर्ती घेत वर्तमानात प्रगती करावी. नगर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. ब्रिटिशांनी चौथे छत्रपती शिवाजी महाराजांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवान करुन मारहाण केली. त्यातच त्यांचे निधन झाले. मात्र, या किल्ल्यात सध्या महाराजांच्या कोणत्याही स्मृती जतन करण्यात आलेल्या नाहीत.
- श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर. 

बातम्या आणखी आहेत...