आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा उपायुक्तांसह सहा जणांच्या निलंबनाचा ठराव; चौकशीकरून दोषींवर गुन्हे दाखल होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर महापौर कदम यांनी एकेकाने बोला अशी सूचना दिली. - Divya Marathi
सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर महापौर कदम यांनी एकेकाने बोला अशी सूचना दिली.

नगर- शहरात प्रभाग २८ मध्ये झालेल्या ट्युबलर पोल पथदिव्यांच्या २० कामात सुमारे चाळीस लाखांचा अपहार झाल्याचा गौप्यस्फोट स्थायी समितीत झाला. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करून गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरल्याने दोन तास गोंधळ सुरूच होता. या कामांच्या फायलींवर ज्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत, अशा सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला. तसेच चौकशी समिती गठीत करून सभा बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली. 


महापालिकेची सर्वसाधारण सभा पीठासीन अधिकारी महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. उपमहापौर श्रीपाद छिंदम, अतिरिक्त उपायुक्त विलास वालगुडे, प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, सभागृहनेते उमेश कवडे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते. 


नगरसेवक दीप चव्हाण यांनी जनतेच्या पैशाची संगनमताने लुटमार झाली आहे, याचा लेखापरीक्षकांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांनी या कामांच्या फायलीवर आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी फायली सभागृहासमोर सादर कराव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली. दरम्यान, उपमहापौर छिंदम यांनी पंधरा दिवसांपासून या फायली मागूनही अधिकाऱ्यांनी दिल्या नाहीत, असा आरोप केला. या प्रकरणात झालेला भ्रष्टाचार उघड झाल्याने फौजदारी गुन्हे दाखल करून शासनस्तरावर चौकशी करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी सत्ता कोणाची आहे? बजेट रजिस्टर कोणाकडे असते? अशी विचारणा केली. त्यावर महापौर कदम बारस्कर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक आम्हाला बोलू द्या, असे वारंवार सांगत असल्याने गोंधळ झाला.

 

चव्हाण यांनी गोंधळामुळे गैरव्यहारचा विषय बाजूला जाईल, असे सांगितले. त्यांनीही बिले नोंदवली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सावळे यांनी तर फायली ठेकेदाराकडे असल्याचे सांगितले. ठेकेदाराकडे फायली गेल्याच कशा असा प्रश्नही नगरसेवकांनी लावून धरला. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक कारवाईच्या मागणीसाठी खाली बसले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. त्यावर महापौर कदम यांनी ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या फायलींवर स्वाक्षरी आहेत, त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त लेखापरीक्षकांची समिती चौकशीसाठी स्थापन करण्याचेही त्यांनी आदेश दिले. त्यात उपायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 


पोल टाकण्याचे काम सुरू 
गैरव्यवहारप्रकरणी गोंधळ सुरू होता. दरम्यान, संबंधिताने पोल टाकण्याचे काम सुरू केले, असा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी केला. त्याचे फोटोही त्यांनी सभागृहात दाखवले. 


फाईल ठेकेदाराकडे कशी ? 
पथदिव्यांच्याकामाची फाईल ठेकेदाराकडे असल्याचे बाळासाहेब सावळे यांनी सांगितले. त्यामुळे बेकायदेशीरपणे ठेकेदारांकडे फायली गेल्याच कशा? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. 


सारसनगरच्या नामांतरासाठी मनसेचे आंदोलन 
सारसनगरचे नामकरण सावित्रीबाई फुलेनगर करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. 


गुन्हे दाखल करण्यास राष्ट्रवादी बरोबर येईल 
महापालिकेची परवानगी घ्या, तुमच्याबरोबर आम्ही देखील गुन्हा दाखल करण्यासाठी बरोबर येऊ. आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. पण आमचे म्हणणे एवढेच आहे की, बजेट रजिस्टरचीही चौकशी करा. आतापर्यंत कितीवेळा बजेट रजिस्टरच्या पानात बदल करण्यात आला हे समोर येऊ द्या. रजिस्टरची मूळ जागा कोठे असते, हे पण स्पष्ट होऊ द्या. स्थायी समितीत महापौरांचे पीए हे रजिस्टर घेऊन आले होते, असे राष्ट्रवादीचे गटनेता संपत बारस्कर यांनी सांगितले. 


ठेकेदार राष्ट्रवादी युवकचा पदाधिकारी 
पथदिवे प्रकरणात ठेकेदार सचिन लोटके हा राष्ट्रवादी युवकचा तालुकाप्रमुख आहे. कोणाच्या तरी वरदहस्तामुळे ही बिले निघाली असावीत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कारवाईच्या मागणीसाठी जशी नैतिकता दाखवली. तशी नैतिकता या प्रकरणात गुन्हा दाखल करून दाखवावी, असे सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी कदम, अनिल शिंदे, सचिन जाधव, दिलीप सातपुते यांनी केला. शिवसेना या प्रकरणात फिर्याद देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


‘त्या’ अधिकाऱ्यांना सभेतून बाहेर काढले 
गैरव्यवहार करून बिले काढण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांच्या त्यावर खऱ्या किंवा खोट्या स्वाक्षरी आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्यानंतर. नगरसेवकांनी सर्व अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर काढण्याचा आग्रह केला. सुरुवातीलाच बाळासाहेब सावळे, विलास सोनटक्के, आर. जी. सातपुते बाहेर गेले. पण दराडे, खरात झिरपे बाहेर जात नसल्याने नगरसेवकांनी व्यासपीठावर धाव घेत त्यांना बाहेर हाकलले. 


या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव 
पथदिव्यांच्या कामात ४० लाखांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी बिल काढण्याच्या प्रक्रियेत ज्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. त्यांना निलंबित करण्याचे आदेश महापौर कदम यांनी दिले. त्यात प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे, शहर अभियंता विलास सोनटक्के, अभियंता आर. जी. सातपुते, लेखाधिकारी दिलीप झिरपे, लेखापरीक्षक चंद्रकांत खरात, बाळासाहेब सावळे यांच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...