आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मध्यवर्ती शहरात जातीय मतभेदांवरून दोन समाजात नेहमीच वाद सुरू असतात. कधी दगडफेक, कधी घोषणाबाजी, तर कधी परस्पर आंदोलने, या सर्व कारणांमुळे कोतवाली पोलिसांना नेहमीच दबावात काम करावे लागते. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे कधी दगडफेकीत रुपांतर होईल, याचा भरोसा नाही. त्यामुळे कोतवाली पोलिसांना नेहमीच दक्ष राहावे लागते. परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहता किरकोळ वादाचे रुपांतर दगडफेकीत झाल्यानंतरच पोलिस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. परंतु गेल्या आठ महिन्यांत ही परिस्थितीत बदललेली आहे. कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांनी पदभार घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन, तेलीखूंट येथील दगडफेक, कोरेगाव भीमा प्रकरणी झालेली दगडफेक, मकर संक्रातीच्या दिवशी दोन समाजात निर्माण झालेली तेढ, तसेच इतर गुन्ह्यांबाबत नेहमीच संवेदनशील राहत तत्काळ घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे काम परमार करत आहेत. पदभार घेताच सुरू झालेले शेतकरी आंदोलन परमार यांनी संयमाने हाताळले. त्यानंतर शहरातील भारनियमनाच्या विरोधात महावितरण कार्यालयावर निघालेले राजकीय आंदोलने देखील परमार यांनी योग्य पध्दतीने हाताळले. कोणतीही भिडभाड न ठेवता आंदोलकांना थेट पोलिस ठाण्यात डांबले. मंत्र्यांचे फोन आले, तरी परमार यांनी नियमात राहूनच काम केले. कोरेगाव - भीमा घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले. परंतु सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना परमार यांनी भर रस्त्यात चोप देत जेरबंद केले. त्यामुळे परमार यांचा मोठा दरारा निर्माण झाला आहे. परिणामी मध्यवर्ती शहरातील दोन समाजात नेहमी धूमसत राहणारी जातीय तेढ कमी होण्यास मोठी मदत होत आहे.
दुचाकी चोरीचे प्रमाण झाले तुलनेने कमी
शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. दुचाकी चोरांना पकडण्याचे सर्वच पोलिस ठाण्यांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, कोतवालीचे निरीक्षक परमार यांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन मुख्य टोळ्या पकडल्या. याप्रकरणी तब्बल २७ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांनी २५ गुन्ह्यांची कबुली दिली. विशेष म्हणजे या आरोपींकडून सर्व दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. दोन्ही टोळ्या पकडल्यानंतर शहरातील दुचाकी चोरीच्या घटना काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत गदारोळ झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी परमार यांनी सभेत हस्तक्षेप करून गोंधळी गुरुजींना ताब्यात घेउन परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे गुरुजींकडून काय धडे घ्यायचे असेही त्यांनी सुनावले होते.
सगळीकडेच बारकाईने लक्ष
कोतवालीची हद्द मोठी आहे. येथे ४५ मशिदी, २७ दर्गे, ३४ मंदिरे व १२ चर्च आहेत. त्याचबरोबर मार्केट यार्ड, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बसस्थानके अशी सार्वजनिक ठिकाणे आहेत. त्यामुळे येथील आंदोलने, तसेच इतर घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. किरकोळ वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात अथवा दगडफेकीत होऊ नये, असाच आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी कुठे काही घडताच शक्य तितक्या लवकर आम्ही घटनास्थळी पोहचतो.
- अभय परमार, पोलिस निरीक्षक, काेतवाली पोलिस ठाणे.
परमार यांची आठ महिन्यांतील कारवाई
खुनाचा गुन्हा (१ अटक), खुनाचा प्रयत्न ६ गुन्हे (१२ अटक ), दरोड्याचा प्रयत्न ३ गुन्हे (११ अटक), दरोडा ३ गुन्हे (११ अटक), जबरी चोरीचे ५ गुन्हे (११ अटक), दुचाकी चोरीचे २५ गुन्हे (२ टोळ्यातील २७ आरोपी अटक), विनयभंगाचे १३ गुन्हे (१९ अटक), जुगार ४९ गुन्हे (१०९ अटक), दारुबंदीचे १७ गुन्हे (१७ अटक), आर्म अॅक्टचे ३ गुन्हे (५ अटक), ११ किलो गांजा जप्त, आकांक्षा व लकी लॉजवर छापे (१५ अटक- ५ पीडित महिलांची सुटका).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.