आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे यांचे 'दक्षिणायन'सुरू झाले असून, माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या दक्षिण नगर जिल्ह्यात असलेल्या जुन्या निष्ठावंताबरोबरच नव्या कार्यकर्त्यांना घेऊन डॉ. विखे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय पक्का केला आहे. त्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व रोग निदान शिबिरे सुरू करून दक्षिण जिल्ह्याची संपर्क यात्रा सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा अवधी असला तरी आतापासून डॉ.सुजय विखे यांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिणेची जागा सध्या भाजपकडे आहे. गेल्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली होती. मात्र या जागेवर राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला होता.
२५ वर्षांपूर्वी डॉ. सुजय यांचे आजोबा माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी देखील नगर दक्षिणेतून निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व बाळासाहेब विखे यांच्यात ही लढत झाली होती. विशेष म्हणजे ही निवडणूक ऐतिहासिक होती. या निवडणुकीत विखे यांचा पराभव झाला होता. मात्र, विखे यांनी दाखल केलल्या खटल्याचा निकाल विखे यांच्या बाजूने लागला होता. त्यामुळे गडाख यांची खासदारकी रद्द झाली होती. त्यानंतर आता डॉ. सुजय हे या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डॉ. सुजय यांनी दक्षिण जिल्हा पिंजून काढला होता. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच ते प्रचारासाठी देऊळगाव सिद्धी (ता. नगर) येथे थेट हॅलिकॉप्टरने प्रचारासाठी आले होते. त्यांच्या सर्वच उमेदवारांना त्यांनी पाठबळ दिले होते. या निवडणुकीपासून त्यांनी लोकसभेचा निर्णय निश्चित केला होता. गेल्या महिन्याभरापासून हालचालींना मोठा वेग आहे. गेल्या आठवड्यातच डॉ. सुजय यांनी विळद घाट येथे दक्षिण नगर जिल्ह्यातील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील राजकीय परिस्थितीबरोबरच छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेतल्या. प्रत्येक तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्याला त्यांनी एक दिवस दिला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात पाथर्डी, शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगाेंदे, कर्जत व जामखेड हे तालुके आहेत.
या सर्व तालुक्यातील निवडक पदाधिकारी डॉ. सुजय यांच्या संपर्कात आहेत.लोकसभेसाठी सर्वाधिक मतदार हे नगर शहर व जिल्ह्यातील असणार आहेत. त्यामुळे त्यांनी नगर शहरातील पदाधिकाऱ्यांबरोबर प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत विखे पॅटर्न राबवण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली देखील सुरू केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर डॉ. विठ्ठलराव विखे मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी नगर दक्षिण जिल्ह्यात सर्व रोग निदान शिबिरे घेण्यास सुरुवात करून अप्रत्यक्षपणे या निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. कोरडगाव (ता.पाथर्डी) येथे त्यांनी पहिले शिबिर घेतले आहे. त्यानंतर ३१ जानेवारीला जामखेड येथे अशा प्रकारचे शिबिर होणार असून, संपूर्ण दक्षिण नगर जिल्ह्यात अशा प्रकारचे शिबिरे ते घेणार आहे. कोरडगाव येथे अशा प्रकारचे पहिले शिबिर घेऊन त्यांनी दक्षिण जिल्ह्याची संपर्क यात्रा सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकेतांमुळे संभ्रम वाढला
राष्ट्रवादी काँग्रेसने दक्षिण नगरची जागा लढवण्याचे संकेत दिल्याने या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी सात्रळ येथे पक्षाचे नेते दिलीप वळसे यांनी लोकसभेसाठी तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण कडू यांना उद्देशून म्हटले.विशेष म्हणजे व्यासपीठावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. प्रसंगी विखे यांनी अपक्ष लढवण्याची तयारी केल्याची चर्चा सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.