आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य परतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉ. राज लाला. समवेत डॉ. प्रवीण पानसरे, डॉ. सुचित गांधी, राजकुमार गांधी. - Divya Marathi
मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉ. राज लाला. समवेत डॉ. प्रवीण पानसरे, डॉ. सुचित गांधी, राजकुमार गांधी.

संगमनेर- दुभंगलेले आेठ, चेहऱ्यावरील व्रण, नाकातील बाह्य विकृती, चेहऱ्यावर पडलेले डाग, अंगभर पसरु लागलेले काळपट केस आदींमुळे व्यक्तीचे बाह्यरुपच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वदेखील खराब झालेले. त्यामुळे समाजातील इतर घटकांपेक्षा आपण काहीतरी वेगळे असल्याची पावलोपावली होणारी जाणीव. स्वत:मधील विकृतीमुळे नाउमेद झालेल्या तब्बल ११३ रुग्णांना शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवजीवन मिळाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर नवे हास्य पसरले. 


भारतीय जैन संघटना, महावीर प्रतिष्ठान आणि आनंदऋषी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शुक्रवार आणि शनिवारी संगमनेरमध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दंतरोग तज्ज्ञ डॉ. सुचित गांधी यांच्या पुढाकाराने दर वर्षी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर घेतले जाते. महागड्या उपचार पध्दती आणि शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने अनेक रुग्णांना आपल्या शरीरावर निर्माण झालेल्या विकृतीवर उपचार करता येत नाहीत. दुभंगलेले आेढ, फाटलेली टाळू, चेहऱ्यावरील डाग यामुळे अनेकांना आपले जीवनदेखील नकोसे होते. समाजातील अशा लोकांचा शोध घेत त्यांची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी जैन संघटनेच्या माध्यमातून संगमनेरात शिबिर घेतले जाते. 


दिवंगत डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात अमेरिकेतील प्रसिध्द सर्जन डॉ. राज लाला, त्यांचे सहकारी डॉ. अमित, डॉ. गीता मुलचंदानी रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रिया करतात. शिबिरासाठी रुग्णांची मोेठी गर्दी होती. दरवर्षी वाढत जाणाऱ्या गर्दीमुळे शहरातील डॉ. प्रवीणकुमार पानसरे, त्यांच्या पत्नी दीपालीदेखील आपले धन्वंतरी रुग्णालय आणि संपूर्ण स्टाफ डॉ. राज लाला यांच्या मदतीला देतात. त्यामुळे रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे सोपे होते. सेवाभावी वृत्तीने भूलतज्ज्ञ डॉ. अनिकेत कासार, डॉ. विनीत सुखठणकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. निखील कडू उपलब्ध असतात. शिबिराच्या यशस्विततेसाठी डॉ. सुचित गांधी, राजकुमार गांधी, डॉ. अमोद कर्पे आदींनी मेहनत घेतली. 


लहान बालकांची संख्या मोठी 
संगमनेरमध्येझालेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरामध्ये लहान बालकांचा समावेश अधिक होता. माता-पिता आपल्यासोबत लहान बालकांना शस्त्रक्रियेसाठी घेऊन आले होते. या बालकांच्या शरीर, चेहऱ्यावरील व्यंगामुळे त्यांचे चेहरे भेसूर दिसत होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील, शरीरावरील व्यंग बहुतांशी कमी झाल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधानाचे हास्य निर्माण झाले. शिबिरात १४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

बातम्या आणखी आहेत...