आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी परीक्षेच्या एक दिवस आधी तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू; भरधाव कारने उडवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बारावीच्या परीक्षेचा चांगला अभ्यास झाला, पण परीक्षा देण्याच्या एक दिवस आधीच तीन विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. नगर- कल्याण महामार्गावरील टाकळी खातगाव (ता. नगर) येथून दुचाकीवर हिवरे कोरडा (ता. पारनेर) गावाकडे जात असताना कल्याणहून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांना उडवले. यात तिघांचा मृत्यू झाला. 


सोमनाथ बाळू गांगुर्डे, प्रतिक ठाणगे (वय १८, दोघे रा. हिवरे कोरडा, ता. पारनेर) व दीपक रंगनाथ गांगुर्डे (वय १८, रा. माळकूप, ता. पारनेर ) अशी मृतांची नावे आहेत. टाकळी खातगाव येथील हनुमान विद्यालयात ते शिकत हाेते. सोमवारी दुपारी प्रवेशपत्र घेण्यासाठी, ते टाकळीत आले होते. काम आटपून ते दुपारी ४ च्या सुमारास दुचाकीवरून हिवरे कोरडाकडे निघाले हाेते. भाळवणीच्या अलीकडे वडगाव आमली फाट्याजवळ कल्याणहून नगरकडे येणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच ०३, सीपी ०१४४) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचा चक्काचूर झाला. कारच्या समोरच्या उजव्या बाजूचा देखील चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर तिघेही शुध्दीवर होते. हिवरे कोरडा येथील सुदाम कोरडे व अन्य नागरिकांनी तिघांना नगरकडे हलवले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिघांची प्राणज्योत मावळली होती. 


तिघांच्याही घरची अर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सोमनाथ गांगुर्डे याच्या मागे आई-वडील व एक बहिण अाहे, त्याचे वडील बाळू वाट्याने शेती करतात. तर प्रतीकच्या घरची परिस्थितीही अत्यंत बेताची आहे. त्यामुळे शिक्षणासाठी तो हा हिवरे कोरडा येथील आपल्या मावस काकाच्या घरी राहत होता.

बातम्या आणखी आहेत...