आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राहुरी शहर- गोहत्या बंदी असताना कत्तलीसाठी गायी व कालवडी डांबून ठेवणाऱ्या दोन कसायांना पुणे व राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने गजाआड केले. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सोमवारी पहाटे ४ वाजता राहुरी शहरातील खाटिकगल्लीत छापा टाकला.
१५ ते २० पोलिसांचे पथक भल्या पहाटे दाखल झाल्याने खाटीकगल्लीत काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आल्याने २ कसायांना जागेवर जेरबंद करण्यात, तसेच गायी व कालवडींची सुटका करण्यास पोलिस पथकाला यश आले.
या छाप्यात १ लाख ४७ हजार किमतीच्या गायी व कालवडी अशा २८ जनावरांची कत्तलखान्यातून पोलिसांनी सुटका केली. जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा एम. एच. १३ ए. एन. ०७१७ हा दीड लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप टेम्पो पोलिसांनी जप्त केला.
कसायांच्या तावडीतून सुटका केलेल्या २८ जनावरांची दुपारी नगरच्या पांजरापोळमध्ये रवानगी करण्यात आली. या पोलिस पथकात राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पुणे एसआरपीएफमधील पोलिस महेश कदम, संदीप जगदाळे, तान्हाजी बोऱ्हाटे, राजकुमार डगळे, सुनील यादव, राहुरीचे पोलिस गुलाब मोरे, महेश भवर, महेंद्र गुंजाळ, मनोज राजपूत, डी. बी. जाधव, बोडखे, वाघस्कर, रवींद्र मेढे, रमिज आतार, आव्हाड या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समावेश होता.
या प्रकरणी काॅन्स्टेबल शिवाजी खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्तार मुस्ताक कुरेशी (वय २८) व मुन्वर फकिरा सय्यद (वय ३२) यांच्याविरुध्द प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध १९६० चा कायदा ११ प्रमाणे, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. डी. जाधव करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.