आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटर कप स्पर्धेतील गावांना विकासनिधीत झुकते माप देऊ; आमदार राजळे यांचे आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- वॉटर कप स्पर्धेच्या माधमातून तालुक्यात झालेली लोकजागृती लाखमोलाची आहे. जलसंधारणाच्या कामात ग्रामस्थांचे योगदान पाहता स्पर्धेत सहभागी गावांना विकास निधीबाबत झुकते माप देऊन सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन आमदार मोनिका राजळे यांनी दिले. 


वॉटर कप स्पर्धेनिमित्त गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या श्रमदान कार्यक्रमाची सांगता तालुक्यातील जोगेवाडी येथे करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, नगरसेवक रमेश गोरे, अनिल बोरुडे, नामदेव लबडे, नगरसेविका मंगल कोकाटे, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ, एकनाथ आटकर, मनीषा वायकर, सुरेखा ढाकणे, मनषा घुले, सविता मुळे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे आदी प्रमुख उपस्थित होते. स्फूर्तिगीते, ग्रामगीते, गात ग्रामस्थांनी गावातून फेरी काढली. अत्यंत उत्साहात श्रमदान करत प्रथम क्रमांक मिळवायचा असा निर्धार प्रत्येकाने हाताच्या मुठी आवळून एकजूट दाखवली. सामूहिक स्फूर्तिगीते गाण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी गोल रिंगण केले. हातवारे करत सहभागी होत आमदार राजळे यांनी स्फूर्तिगीतांत भाग घेतला. 


आमदार राजळे म्हणाल्या, वॉटर कप स्पर्धेमुळे तालुक्यात जलसंधारणाची झालेली कामे जलयुक्त शिवार योजनेच्या उपक्रमाला पूरक आहेत. तालुक्यात एकूण २३ गावांनी स्पर्धेत भाग घेतला. सर्वच गावांमध्ये चांगली कामे झाली आहेत. कामाचा दुसरा टप्पा आता वृक्षलागवड चळवळीने सुरू होईल. १ जुलैपासून सर्वच गावांमध्ये महावृक्षलागवड कार्यक्रम हाती घेऊन पाणीदार गावानंतर आता हिरवीगार गावे करण्याचा प्रयत्न करू. लोकांच्या मनात गावाच्या विकासाबाबत जागृती वाढली. आपण गावासाठी काहीतरी करतो, अशी भावना अधिक कार्यप्रवण करणारी ठरत आहे. वॉटर कप स्पर्धेच्या निकालानंतर बक्षीस कोणालाही मिळाले, तरी संपूर्ण तालुक्याला मिळाले असे गृहीत धरून पुढच्या कामाला लागावे. प्रास्ताविक पाणी फाउंडेशनचे समन्वयक शहाजी शिंदे यांनी, तर सूत्रसंचालन रोहिदास आघाव यांनी करून आभार मानले. 


जलपूजनासाठी मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करू 
जलयुक्त शिवार योजनेच्या यशस्विततेनंतर तालुक्यात वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलजागृती, जलसाक्षरता व जलबचतीची चळवळ यशस्वी झाली. आगामी पावसाळ्यामध्ये संपूर्ण तालुका पाणीदार होणार आहे. जोगेवाडी येथील झालेल्या कामाची भव्यता, ग्रामस्थांचे योगदान पाहता जलपूजन सोहळ्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करणार असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...