आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे - कृषिप्रधान देशात दिव्यांग कृषी पदविकाधारकावर कृषी आयुक्तालयाकडून नोकरभरतीत अन्याय होतो. पाच आयुक्त बदलून जातात, पण ४ वर्षे खेट्या घालूनही न्याय न मिळाल्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाची नोटीस दिली. तरीही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर नेवासे तालुक्यातील गोणेगावच्या अविनाशने मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आश्वासन दिल्यानुसार सोमवारी (१२ फेब्रुवारी) तब्बल ४ वर्षे आयुक्तालयात अडकलेली फाईल मंत्रालयात जाणार आहे.
गोणेगाव येथे शेतकरी कुटुंब, थोडफार स्थानिक राजकारणात सहभाग घेऊन सेवा संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेले व स्वस्त धान्य दुकानही चालवून प्रपंच करणारे विठ्ठलराव शेटे यांना दोन मुले आहेत. त्यातील अविनाशने बुधवारी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली.
अविनाश हा कला शाखेचा पदवीधर व कृषी पदविकाधारक आहे. हातामध्ये अपंगत्व असलेल्या अविनाशने २०१३ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदासाठी परीक्षा दिली. अपंगांच्या तीन जागा राखीव होत्या. अपंग असतानाही व पैसे भरूनही त्याला परीक्षा घेणाऱ्यांनी लेखनिक दिला नाही. तेथून अन्यायास सुरुवात झाली. तरीही अविनाशला १०० पैकी ८३ गुण मिळाले. परंतु रिक्त जागा रिक्तच होत्या. पाठपुरावा करताना माहितीच्या अधिकारात नंतर त्या भरल्या गेल्याचे समजले. त्याने दाद मागण्यास सुरुवात केली. २०१४ पासून आजतागायत अनेकवेळा पुण्याच्या कृषी आयुक्तालयात खेट्या मारल्या. दरम्यानच्या काळात ४ आयुक्त बदलले. प्रत्येकाला हे प्रकरण माहिती होती. एक आयुक्त तर मी तुमच्याच मातीतला आहे, असे आश्वासन देत असे, पण न्याय काही मिळत नव्हता. नवीन आलेल्या आयुक्तांनी तर २ मिनिटेसुद्धा वेळ दिला नाही. त्यामुळे अखेर अविनाशने आत्मदहनाची नोटीस दिली होती.
अविनाश ४ ला घरातून निघून गेला. घरच्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाचा इशारा असल्याने वडील व गावातील मंडळी शोध घेत मंत्रालयात पोहोचले. आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर जमा झालेल्या पोलिसांनी त्याला पकडले. कायदेशीर बाबी झाल्यानंतर मंत्रालयातच असलेले कृषिमंत्री फुंडकर यांची अविनाशशी भेट घडवून देण्यात आली. अविनाशसमोरच फुंडकरांनी आयुक्तांना फाईल घेऊन मंत्रालयात बोलावले. सोमवारी ४ वर्षे पुण्यात अडकलेली फाईल मंत्रालयात पोहोचणार आहे. न्याय मिळेल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे, असे अविनाशने सांगितले. न्याय मिळेपर्यंत लढा देत राहू, असा निर्धारही त्याने व्यक्त केला.
कृषिप्रधान देशामध्ये अधिकारी व नेतेमंडळी शेतकऱ्याचीच मुले असल्याचे सांगतात, पण कृषी पदविकाधारकाला मात्र आत्मदहनापर्यंत आंदोलन करावे लागते, ही बाब चिंतनीय असल्याची प्रतिक्रिया नेवासे तालुक्यात व्यक्त होत आहे. दरम्यान, अविनाशतचे वडील विठ्ठलराव व गावातील अर्जुन रोडे आदींशी त्याची मंत्रालयात भेट झाल्यावर ते पुन्हा नेवाशाला निघाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.