आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका कार्यालयात युवक काँग्रेसचा ठिय्या; एलईडी पथदिव्यांच्या चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- प्रशासनाचा धिक्कार असो, एलईडी पथदिव्यांची चौकशी झालीच पाहिजे, भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी नगरपालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 


पालिकेच्या कारभारावर तीव्र शब्दात टीका करताना आंदोलकांनी कर्मचाऱ्यांची बोलती बंद केली. आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. प्रतीक खेडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, बबन सबलस, जुनेद पठाण, पांडुरंग हंडाळ, लालाभाई शेख, विवेक देशमुख, किशोर डांगे, पवन मुखेकर, स्वप्निल काकडे, शेखर चितळे, किशोर परदेशी, आकाश वारे, तुषार पालवे, ओमकार राठोड, संतोष वाघमारे, राजेंद्र नांगरे आदी पदाधिकाऱ्यांनी केले. 


यावेळी खेडकर व रक्ताटे म्हणाले, गेल्या सतरा महिन्यांच्या कारभारात पालिकेने नागरिकांची निव्वळ फसवणूक केली. सर्वच विकासयोजनांची कामे संशयास्पद आहेत. एक कोटी ५१ लाखांचे एलईडी पथदिव्यांचे काम शहरात सुरू असून त्यापैकी विविध ठिकाणी मिळून सुमारे साडेचारशे दिवे बसवण्यात आले आहेत. विसंगत किमती व अंदाजपत्रकीय रकमे कडे बघून यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड व अन्य कार्यकर्त्यांनी केलेली मागणी पालिका प्रशासनाने दुर्लक्षित केली. प्रशासनावर नेमके नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यामार्फत विधिमंडळात पथदिवे घोटाळ्यासह अन्य भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून स्वतंत्र चौकशी करायला लावू. युवक नेते डॉ. सुजय विखे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून प्रसंगी पालिका बेमुदत बंद ठेवून गाव बंद आंदोलन करु. बाहेरून साळसूद दिसणारे अनेक जण एलईडी प्रकरणात अडकल्याचे चौकशीअंती निष्पन्न होणार आहे. नवे पथदिवे अवघ्या पंधरा दिवसांत कसे बंद पडतात. पालिकेने ठेकेदाराचे एक कोटी १६ लाखांचे बिलसुद्धा मंजूर केले आहे. तक्रारीची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच बिले मंजूर करण्याची घाई नेमकी कोणाला झाली. कुणी दबाव वापरला, याची शहरात चर्चा सुरु आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभाराचा विसर सर्वांनाच पडला आहे. कुणी बोलत नाही याचा अर्थ लोकांना समजत नाही, असा पालिका प्रशासनाने घेऊ नये. आगामी काळात वेळोवेळी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन जाब विचारू. 


नायब तहसीलदार पंकज नेवसे व कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद यांनी आंदोलकांशी चर्चा केली. येत्या सात दिवसांत चौकशी होईल. तंत्रनिकेतनमार्फत थर्ड पार्टी लेखापरीक्षण सुरू आहे. त्रिसदस्यीय समिती यापूर्वीच नेमली आहे. चौकशी अहवाल, लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करू. अंतिम देयक अद्याप दिलेले नाही, असे पत्र प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 

 

चौकशी समितीचीच आधी चौकशी करा... 
शहराचा उकिरडा झाला आहे. एकही काम गैरप्रकारांशिवाय झालेले नाही. यापूर्वी दाखल तक्रारीवरून पालिका प्रशासनाने चौकशी समितीमध्येच ठेकेदाराला घेतले. त्या ठेकेदाराचे नातेवाईक पथदिव्यांचे काम करत आहेत. सर्वप्रथम या चौकशी समितीची चौकशी झाली पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...